भाजपाध्यक्षपदाची माळ अमित शहांच्याच गळ्यात
By admin | Published: January 24, 2016 11:31 AM2016-01-24T11:31:52+5:302016-01-24T17:26:53+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा बजावणारे अमित शहा यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजपाला संपूर्ण बहुमत मिळवून देण्यात अतिशय मोलाचा वाटा बजावणारे अमित शहा यांची आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.
आज दुपारी शहा यांनी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला मात्र त्यांच्याविरोधात कोणीच उभे न राहिल्याने शहा यांची एकमताने आणि बिनविरोध निवड झाली. पुढील तीन वर्षांसाठी अमित शाह यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा राहणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी भाजपाचे अध्यक्षपद सोडलं होतं. त्यामुळे पदाची जबाबदारी शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली होती व ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत होते. मात्र दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर शहा यांच्या उचलबांगडीची चर्चा सुरु झाली होती.
अखेर आज शाह यांचीच पुन्हा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आल्याने सर्व चर्चा थंडावल्या.
दरम्यान शहा यांची फेरनिवड होत असताना भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच यशवंत सिन्हा हे मात्र या कार्यक्रमापासून दूरच राहिल्याचे चित्र दिसले.