'प्रशांत किशोर ज्या शाळेचे विद्यार्थी, अमित शाह त्या शाळेचे हेडमास्तर'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 10:28 AM2019-06-09T10:28:07+5:302019-06-09T10:54:51+5:30
किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत बंगालचा गड भाजपपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. प्रशांत किशोर हे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यापेक्षा मोठे राजकीय रणनितीकार असूच शकत नाही, असा दावा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.
भाजप महासचिव विजयवर्गीय म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या तुलनेत अमित शाह मोठे राजकीय रणनितीकार आहेत. भाजप अध्यक्ष त्या शाळेचे हेडमास्तर आहेत, ज्या शाळेत प्रशांत किशोर यांनी शिक्षण घेतले. तसेच पश्चिम बंगालमधील जनतेचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे ममता यांना पराभवापासून कोणताही राजकीय रणनितीकार वाचवू शकत नाही, असंही विजयवर्गीय म्हणाले.
किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. टीएमसीकडून देखील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर जुलैपासून किशोर कामाला सुरुवात करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला. तर तृणमूल काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या देखरेखीत आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने शानदार विजय मिळवला असून विधासभेत सत्ता मिळवली. तर लोकसभा निवडणुकीत देखील घवघवीत यश मिळवले.