अमित शहांना भेटला शेरास सव्वाशेर, दिलं जशास तसं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:45 PM2018-10-11T21:45:56+5:302018-10-11T21:46:26+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी तेलंगणामध्ये मुदतीपूर्वीच होणा-या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हैदराबाद- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी तेलंगणामध्ये मुदतीपूर्वीच होणा-या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीनंही अमित शाहांवर पलटवार केला आहे. आधी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002च्या निवडणुकांसंदर्भात विचारा, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर राव यांनी दिलं आहे.
अमित शाह निवडणुकीच्या प्रचारासाठी तेलंगणामध्ये दाखल झाले आहेत. जर तेलंगणातल्या निवडणुका लोकसभेबरोबर झाल्या असत्या तर केसीआर यांना पराभव चित्र पाहायला लागलं असतं. त्यामुळे त्यांनी मुदतीपूर्वी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. केसीआर मोदींना घाबरतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी विधानसभा विसर्जित करून जनतेवर कोट्यवधी रुपयांचा निवडणूक खर्च लादला आहे. त्यानंतर लोकसभेचे खासदार असलेल्या बी. विनोद कुमार यांनीही अमित शाहांना प्रतिप्रश्न केला आहे. बरेच मोठे नेते मुदतीपूर्वी निवडणुका करून झाले आहेत. मग केसीआर यांच्यावर प्रश्न का उपस्थित केला जातोय?, असं बी. विनोद कुमार म्हणाले आहेत.
सर्वच राजकीय पक्ष कधी ना कधी मुदतीपूर्वी निवडणुका घेऊन झाले आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, एनटी रामाराव आणि चंद्राबाबू नायडू, नरेंद्र मोदींनीही मुदतपूर्व निवडणुका घेतल्या आहेत. 2014च्या निवडणुकीत दलित मुख्यमंत्री बनवणार असल्याचं केसीआर यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण न केल्याचा आरोप अमित शाहांनी केला आहे. तसेच केसीआर हे स्वतःची मुलगी कविता किंवा मुलगा केटी रामाराव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छितात. त्यावर कुमार म्हणाले, अमित शाहांना माहीत पाहिजे की, 2014मध्ये केसीआर यांनी अशा प्रकारचं कोणतंही विधान केलेलं नव्हतं. तसेच कोणी दलित मुख्यमंत्री बनेल, असंही म्हणाले नव्हते. तर पुन्हा केसीआर मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचंही बी. विनोद कुमार म्हणाले आहेत.