UP Election 2022 : शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् दरवर्षी 2 सिलिंडर मिळणार फ्री, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:01 PM2022-02-08T13:01:10+5:302022-02-08T13:07:12+5:30
UP Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) भाजपने आज (मंगळवार) संकल्प पत्र (Samkalp Patra) म्हणजेच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रात सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोचिंगची व्यवस्था केली जाईल.
युवकांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये आयटीआय स्थापन करण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी होळी आणि दीपावलीच्या दिवशी 2 मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातील. 60 वर्षांवरील महिलांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. विधवा आणि निराधार महिलांसाठी निवृत्ती वेतन दरमहा 1,500 रुपये करण्यात येणार आहे, असे अमित शाह म्हणाले.
BJP UP team has given form to this 'Sankalp Patra'. It is not just a 'ghoshna patra', it is UP govt's resolution... the 2017 'Sankalp Patra' had 212 resolutions, of which 92 have been fulfilled. We do what we say: Union Home Minister Amit Shah#UttarPradeshElections2022pic.twitter.com/N4UROYUl3G
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 8, 2022
आज मला 5 वर्षांपूर्वीचे दृश्य आठवते. हीच जागा होती, तेव्हा भाजपने जाहीरनामा जनतेसमोर ठेवला होता. तेव्हा मी पक्षाचा अध्यक्ष होतो. 2014 मध्येच जनतेने सांगितले होते की 2017 मध्ये यूपीमध्ये भाजपचे सरकार बनणार आहे. 2014 मध्ये भाजपने 80 पैकी 73 जागा जिंकल्या आणि 2017 मध्ये विधानसभेच्या 300 पेक्षा जास्त जागा लोकांनी जिंकल्या, असे अमित शाह यांनी सांगितले.
तसेच, अमित शाह म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचा विकास प्रत्येक क्षेत्रात झाला. गुन्हेगारांना आज राजकारणात स्थान नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारीमुक्त करण्याचे काम केले आहे. त्यांनी प्रशासनाचे राजनीतीकरणही थांबवले. 2017 च्या जाहीरनाम्यात 212 संकल्प होते, त्यापैकी 92 टक्के संकल्प पूर्ण झाले आहेत. यावेळी पुन्हा भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे, असे अमित शाह म्हणाले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचे 86 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे काम केले, असे अमित शाह म्हणाले. याचबरोबर, पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश हे दंगायुक्त राज्य म्हटले जात होते. बहिणी-मुली सुरक्षित नव्हत्या. भाजप सरकारच्या पाच वर्षानंतर राज्यातून गुन्हेगारांचे स्थलांतर झाले आहे. लुटमारीच्या घटनांमध्ये 57 टक्के आणि बलात्काराच्या घटनांमध्ये 42 टक्के घट झाली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.