अमित शाहांचा एका वाक्यात संजय राऊतांवर पलटवार; सभागृहात सर्व खासदार खळखळून हसले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:51 AM2023-08-08T10:51:08+5:302023-08-08T10:52:14+5:30
आमच्या मनात असा कुठलाही समज नाही की हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत सन्मान आहे असं अमित शाहांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोकसभेसोबतच राज्यसभेतही हे विधेयक पारित करण्यात केंद्र सरकारला यश आले. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राऊतांवर एका वाक्यात पलटवार केला त्यानं सभागृहात हशा पिकला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, संजय राऊत म्हणतात, मोदी परदेशात जातात, त्यांचा सन्मान केला जातो. कोण त्यांचे ऑटोग्राफ मागतो, कुणी वाकून नमस्कार करतो. कुणी भेटण्याची वेळ मागतो, कुणी BOSS म्हणतं. पण हा सन्मान नरेंद्र मोदींचा एकट्याचा नव्हे तर देशाचा सन्मान आहे. आमच्या मनात असा कुठलाही समज नाही की हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत सन्मान आहे. हा नरेंद्र मोदी नावाच्या पंतप्रधान असलेल्या देशाचा सन्मान आहे. पण इतर देशाचे सर्व राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना सन्मान देतात हे पाहून तुम्हीही थोडा सन्मान द्यायला सुरु करा, चांगले दिसेल असा टोला शाहांनी संजय राऊतांना लगावला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून दाद दिली तर संजय राऊतांनाही हसू आवरले नाही.
त्याचसोबत जे लोक आमच्यावर आरोप करतात स्वातंत्र्याच्या योगदानात भाजपाचा सहभाग नव्हता त्यांना उत्तर देताना आमच्या पक्षाचा जन्म १९५० मध्ये झाला मग आम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत कसं असणार? पण आमच्या पक्षाचे अनेक संस्थापक स्वातंत्र्य चळवळीत होते. आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे बंगाल भारतात आहे. आज काश्मीर भारतात आहे कारण श्यामाप्रसाद मुखर्जींमुळे आहे. आमच्यावर आरोप केला जातो नागपूरहून आम्हाला इशारा येतो. एकवेळ हे मान्य करतो. नागपूर हा भारताचा भाग आहे परंतु तुम्हाला रशिया, चीनवरून इशारा येतो. कम्युनिस्ट पार्टी देशभक्तीवर बोलते हे आम्हाला काय शिकवणार असा सवालही अमित शाहांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते संजय राऊत?
दिल्ली विधेयकावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत विधानसभा आहे, दिल्लीतील लोकांनी निवडून दिलेलं सरकार दिल्लीत आहे. दिल्लीचे मुख्य सचिव किंवा एलजी मतं मागायला गेले नव्हते. लोकांनी त्यांना मत नाही दिले. मत मागायले गेले होते केजरीवाल किंवा मुख्यमंत्री किंवा एखादं सरकार, नेता. दिल्लीच्या विधानसभेत तुमचे ५ आमदार नाहीत, आजपर्यंत ६ वेळा तुम्ही दिल्लीची निवडणूक पराभूत झाला आहात. पण, दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, प. बंगाल असेल किंवा तामिळनाडू असेल तुम्ही ताबा घेऊ इच्छिता, असे म्हणत राऊत यांनी दिल्ली सेवा विधेयकातील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, मोदी सरकारला लोकशाही मान्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच, तुमच्याकडून सर्वकाही विकलं जात असल्याचं सांगताना त्यांनी काव्यपंक्तीही म्हटल्या. “मत पुँछो के इस दौर मे क्या क्या नही बिका, आपके आँखो की शरम तक आपने बेच दी” कवि गोपालदास यांच्या या काव्यपंक्ती वाचून दाखवत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत तुमच्या डोळ्यात लाजसुद्धा उरली नाही, असेही राऊत यांनी म्हटले.