अमित शाहांची प्रकृती पुन्हा बिघडली; प. बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 10:08 PM2019-01-22T22:08:05+5:302019-01-22T22:10:34+5:30
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. अमित शाह प्रकृती अस्वास्थ्यामुळे पश्चिम बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. अमित शाह प्रकृती अस्वास्थ्यामुळे पश्चिम बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले आहेत.
गेल्या आठवड्यात अमित शाह यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी येथील एका सभेत हजेरी लावली असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या अंगात ताप असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी अमित शाह यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, अमित शाह दिल्लीला परतल्यामुळे पश्चिम बंगालमधील त्यांच्या नियोजित सर्व सभा रद्द होण्याची शक्यता आहे.
(दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना सवाल)
गेल्या बुधवारी अमित शाह यांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवरून आपल्या आजारपणाची माहिती दिली होती. मला स्वाईन फ्लू झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. देवाचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच बरा होईन, असे अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
(अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द)