पंतप्रधान मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:26 IST2023-10-11T17:25:55+5:302023-10-11T17:26:37+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.

पंतप्रधान मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह
रोहतक : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. कधीच न करता आलेली कामगिरी भारतीय शिलेदारांनी केली अन् पदकांचे शतक झळकावले. २०१८ मध्ये भारताला सर्वाधिक ७० पदकं जिंकता आली होती. मात्र, यंदाच्या पर्वात भारतीय खेळाडूंनी मुसंडी मारताना पदकांची संख्या १०७ वर पोहचवली. प्रथमच एवढी पदकं भारताच्या वाट्याला आल्याने क्रीडा विश्वासह जगात तिरंग्याची शान वाढली. चीनच्या धरतीवर रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या थरारानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यांचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय नेतेमंडळी देखील या ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत त्यांचे अभिनंदन करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे दिसते.
हरयाणातील रोहतक येथे बोलताना अमित शहा यांनी भारतीय खेळाडूचं अभिनंदन केलं. तसेच २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच १०० हून अधिक पदकं जिंकली. २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात खूप चांगला खेळला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान मोदी. कारण त्यांनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, ज्यामुळे भारताला हे यश मिळालं. खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेतली. यादरम्यान 'खेलो इंडिया' गेम चेंजर ठरला."
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले.