अमित शाह म्हणतात, 2019 साली भाजपाला मिळणार 50 टक्क्यांहून अधिक मते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 08:01 AM2018-03-25T08:01:06+5:302018-03-25T08:01:06+5:30
एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल.
नवी दिल्ली - एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल, असा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपामध्ये ऐनवेळी झालेली आघाडी हे भाजपाच्या पराभवाचे मुख्य कारण होते. मात्र पक्ष पराभवाचे विश्लेषण करत असून, 2019 साली भाजपा 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजयी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवाचे नेमके कारण सांगितले. "सपा आणि बसपामध्ये अखेरच्या क्षणी झालेल्या आघाडीमुळे फुलपूर आणि गोरखपूरमधील पोटनिवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र 2019 च्या निवडणुकीत सपा आणि बसपाची ही खेळी यशस्वी ठरणार नाही. भाजपाला दोन जागांवर पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसने संसद भवन परिसरात मिठाई वाटल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसकडून आम्ही 11 राज्यांमधील सत्ता खेचून घेतली याची चर्चा कुणीच करत नाही. त्रिपुराबाबतही कुणी बोलत नाही."असे ते म्हणाले.
"पोटनिवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी असतात. पण सार्वत्रिक निवडणुका ह्या ज्येष्ठ नेते आणि मोठ्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढवल्या जातात याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. तसेच तेलगू देसम पक्षाने एनडीएला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. "2014 साली 11 पक्ष एकत्र आले होते. त्यातील केवळ एका पक्षाने साथ सोडल्याने काहीही फरक पडणार नाही." असे त्यांनी सांगितले.