Amit Shah, Article 370: "रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा छोटासा दगडही मारू शकले नाहीत"; ३७० कलमाबाबतच्या निर्णयावर अमित शाह यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 08:27 PM2022-05-19T20:27:46+5:302022-05-19T20:32:32+5:30
सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरही केलं भाष्य
Amit Shah, Article 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होती. अनेकांनी त्यावेळी या कलमाबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलने करून प्रश्नाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. पण ज्या लोकांनी मोठ्या मोठ्या गप्पा रंगवल्या, ते लोक केंद्र सरकारच्या ठाम भूमिकेमुळे नंतर काहीच करून शकले नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी विरोधकांवर निशाणा साधला. ३७० कलम रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील (खून की नदी बहेंगे) अशा शब्दांत लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणारे नंतर साधा छोटा दगड मारण्याचंही धाडस करू शकले नाहीत", असेही ते म्हणाले. दिल्लीत 'आइडिया ऑफ इंडिया फ्रॉम स्वराज टू न्यू इंडिया' या परिसंवादात ते बोलत होते.
"पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ ला अतिशय सहजपणे ३७० कलम रद्द केले. त्यावेळी अनेक जण धमक्या देऊन लोकांची माथी भडकवत होते. कलम रद्द झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणणारे लोक सरकारने केलेल्या धोरणांपुढे साधा एक छोटासा दगडही मारू शकले नाहीत", अशा शब्दांत अमित शाह यांनी थेट विरोधकांवर टीका केली.
सुरक्षा धोरण आणि सर्जिकल स्ट्राईक...
अमित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर बोलताना देशांतर्गत सुरक्षा धोरणावर भाष्य केले. "नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्याआधी भारताकडे ठोस सुरक्षा धोरण (defence policy) नव्हते. जरी एखादे धोरण असेल तरीही त्यात परराष्ट्र धोरणाचीच छबी दिसत असायची. आधी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या संघटना आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे आणि हल्ले घडवून आणायचे. उरी आणि पुलवामा असे हल्लेही आपल्या देशात घडले. पण त्यानंतर दहशतवाद्यांना भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आणि देशाचे सुरक्षा धोरण किती मजबूत आहे याची प्रचिती जगाला आली", असेही शाह यांनी नमूद केले.