बिहारच्या 'बाहुबली' मित्राला अमित शाहांनी दिला 'शॉक', पत्ता कापला; आता २०२४ मध्ये भाजपा सीट काढून घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:49 PM2023-04-03T15:49:11+5:302023-04-03T15:53:02+5:30
बिहारच्या बाबतीत अमित शाह सध्या नव्या रणनितीवर काम करत आहेत. प्रत्येक सीटवर लक्ष देऊन राजकीय गणित मांडत आहेत.
पाटणा/नवादा-
बिहारच्या बाबतीत अमित शाह सध्या नव्या रणनितीवर काम करत आहेत. प्रत्येक सीटवर लक्ष देऊन राजकीय गणित मांडत आहेत. लक्ष्य फक्त नितीश कुमार यांना पराभूत करणं हेच आहे. यासाठी कुणाचाही राजकीय बळी द्यावा लागला तरी भाजपा तयार आहे. नवादा लोकसभा मतदारसंघ याच पेचात आला आहे. रिपोर्टनुसार नवादाच्या जागेवर २०२४ मध्ये भाजपा निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत. २०१९ मध्ये या जागेवरून बाहुबली सुरजभान सिंहचा भाऊ चंदन सिंह हे लोक जनशक्ती पक्षाकडून विजयी झाले होते. ते सध्या या मतदार संघाचे विद्यमान खासदार आहे. पण आता या जागेवर भाजपाचं लक्ष गेलं आहे.
नवादामधून सुरजभानच्या भावाचा पत्ता कट?
नवादा येथील खासदार बाहुबली सूरजभान सिंह यांचा भाऊ चंदनसिंहचा पत्ता साफ झाला आहे असं मानलं जात आहे. कारण बिहार दौऱ्यात अमित शाह यांनी मोठा धक्का दिला आहे. नवादा येथे रविवारी भारतीय जनता पक्षातर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत अमित शाह म्हणाले की २०२४ मध्ये या जागेवरून लढण्याची तयारी करा. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत नवादा येथून निवडणूक लढवणार आहे. प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी अमित शाह हिसुआ येथे पोहोचले होते.
शाहा यांनी भाषणापेक्षा बैठकीला जास्त वेळ दिला
नवादा सभेपूर्वी अमित शहा यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नेत्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अमित शाह ज्या ठिकाणी सभा घेणार होते, त्याच्या जवळच ही बैठक निश्चित करण्यात आली होती. अमित शहा यांनी भाषणापेक्षा या सभेसाठी जास्त वेळ दिल्याचं बोललं जातं. स्थानिक नेत्यांचा अभिप्राय घेतल्यानंतर ते म्हणाले की, भाजपा नवादा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, तुम्ही तयारीला लागा.
अमित शाहांच्या 'टार्गेट ९०'मध्ये नवादाचा समावेश
भाजपच्या सूत्रांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी देशातील लोकसभेच्या ९० जागांची जबाबदारी स्वत: घेतली आहे. या जागांची तयारी खुद्द अमित शाहा पाहत असून, नवादा मतदारसंघाचाही समावेश याच ९० मतदार संघांमध्ये झाला आहे. अमित शाहा आपल्या पुढील बिहार दौऱ्यात नवादा येथील सर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचं समजतं. म्हणजेच सूरजभान सिंह आणि त्यांचे खासदार भाऊ चंदन सिंह यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
सूरजभान कोटा मुंगेरी सीटवर शिफ्ट होणार?
२०१४ मध्ये भाजपाचे गिरीराज सिंह नवादामधून खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये जागांच्या अदलाबदलीत नवादा ही जागा एलजेपीला आणि मुंगेरची जागा जेडीयूला देण्यात आली. गिरीराज सिंह यांना बेगुसराय येथे हलवण्यात आलं होतं. आता जेडीयू भाजपपासून वेगळी झाली आहे, त्यामुळे आता मुंगेरची जागा एलजेपीला (पारस गट) देऊ शकते. सूरजभान यांच्या पत्नी वीणा देवी यापूर्वी खासदार राहिल्या आहेत. सध्या सूरजभान यांचे भाऊ चंदन सिंह हे एलजेपी (पारस गट) कडून नवादाचे खासदार आहेत.