अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 09:13 PM2017-10-09T21:13:20+5:302017-10-09T21:15:18+5:30

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Amit Shah should resign after retaining Advani, Gadkari tradition - Prithviraj Chavan | अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

googlenewsNext

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना ही मागणी केली. संघाच्या इशाऱ्यावरून का होईना परंतु, आरोप झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी राजीनामे दिल्याची आजवरची परंपरा आहे. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी जैन डायरी प्रकरणात नाव आल्यामुळे, बंगारू लक्ष्मण यांनी तहलका प्रकरणात आरोप झाल्यामुळे तर नितीन गडकरी यांनी पूर्ती उद्योग समूहासंदर्भातील आरोपांमुळे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे राजीनामे दिले होते. त्यानुसार अमित शहा यांनी सुद्धा त्यांच्या मुलाबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होईपर्यंत पदावरून बाजुला झाले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

‘द वायर’ या वेबसाइटने भाजपाध्यक्षांचे चिरंजीव जय शहा यांची कंपनी टेंपल एन्टरप्रायजेसच्या व्यवहाराबाबत काही माहिती समोर आणली आहे. यावरून त्यांच्या कारभाराबाबत ‘क्रॉनी कॅपिटॅलिझम’ची शंका निर्माण होते. पंतप्रधानांनी ‘क्रॉनी कॅपिटॅलिझम’विरूद्ध जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ‘द वायर’च्यामाहितीची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पंतप्रधानांनी मौन सोडून या प्रकरणाची प्रवर्तन संचलनालय किंवा केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश द्यावेत, अशीही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. अमित शहा लोकप्रतिनिधी असल्याने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही तपासायला हवे, असेही ते म्हणाले.

जय शहा यांच्या बचावार्थ पियुष गोयल यांनी पुढाकार घेतल्यासंदर्भातही चव्हाण यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, जय शहा यांचा सरकारशी थेट संबंध नाही. त्यामुळे सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्या वतीने खुलासा करणे किंवा ते मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती देणे, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. पियुष गोयल नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाचे मंत्री असताना त्यांच्या अखत्यारीतील भारतीय नवीकरणीय उर्जा विकास संस्था नामक सार्वजनिक कंपनीतून जय शहा यांच्या कंपनीला पवन उर्जा प्रकल्पासाठी १०.३५ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. जय शहा यांची कंपनी समभाग विक्रीच्या व्यवसायात असून, त्यांचा पवन उर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही जय शहा यांच्या कंपनीला कर्ज मिळाल्यासंदर्भात पियुष गोयल यांनीच उत्तर देण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर जय शहा यांच्या बचावासाठी पियुष गोयल समोर आल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. खरे तर या प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी नव्हे तर जय शहा किंवा त्यांच्या वकिलांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. भाजपला खुलासाच करायचा असेल तर तो पंतप्रधानांनी करावा. कारण या प्रकरणाचा संबंध थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुलाशी जुळलेला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले.

केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर जय शहा यांच्या कंपनीच्या व्यवहारात अचानक १६ हजार पटींनी वाढ झाली. परंतु, त्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये लगेच ही कंपनी अचानक बंद करण्यात आली. हवाला व्यवहारात गुंतलेल्या कंपन्यांची कार्यपद्धती साधारणतः अशीच असते. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा निर्णय होण्याच्या काही दिवस अगोदर ही कंपनी बंद करणे, याला निव्वळ एक योगायोगच मानायचा का? नोटाबंदीमध्ये २ लाख बनावट (शेल) कंपन्यांचा पर्दाफाश झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पण नोटाबंदीतून बनावट (शेल) कंपन्यांचा पर्दाफाश होण्याचा आणि नोटाबंदीपूर्वीच जय शहा यांनी कंपनी बंद करण्याचा संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होण्याची गरज माजी मुख्यमंत्र्यांनी विषद केली.

Web Title: Amit Shah should resign after retaining Advani, Gadkari tradition - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.