महाआघाडीमध्ये नाही मोदींना हरवण्याची ताकद - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 08:17 AM2018-03-18T08:17:16+5:302018-03-18T08:17:16+5:30
2019 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून होत असलेल्या सर्वपक्षीय एकजुटीची भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खिल्ली उडवली आहे.
नवी दिल्ली - 2019 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून होत असलेल्या सर्वपक्षीय एकजुटीची भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींविरोधात होत असलेल्या सर्वपक्षीय एकजुटीच्या कल्पनेचे अमित शाह यांनी स्वागत केले आहे. तसेच विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात आणण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाबाबत बोलताना 300 हून अधिक खासदारांचे बळ असलेली एनडीए या प्रस्तावाला आरामात सामोरी जाईल, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर भाजपाविरोधात विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले, "एक काळ होता जेव्हा इंदिरा गांधींविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट होत असे. आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता मोदींविरोधात विरोधी पक्षांमध्ये एकजूट होत आहे." आजच्या घडीला देशातील 67 टक्के भागावर भाजपाचे राज्य आहे. याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्षाकडून आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत लोकसभेत दिलेल्या अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे. मोदी सरकारविरोधात आणण्यात येत असलेल्या अविश्वास प्रस्तावावरही अमित शाह यांनी भाष्य केले. "एकीकडे विरोधी पक्ष सभागृहातील कामकाज होऊ देत नाहीत दुसरीकडे अविश्वास प्रस्तावाचे नोटीसही दिले जात आहे."हा प्रस्ताव इतक्या उशिराने का आणण्यात आला आहे. आम्ही अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची संपूर्ण तयारी केली आहे. सभागृहात नियमांनुसार मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस आणि इतर पक्षांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळेच ते सभागृहातील कामकाजामध्ये अडथळे आणत आहेत."असा टोला शाह यांनी लगावला.