'विनंती करतो सुरक्षा घ्या अन् आमची चिंता दूर करा'; अमित शाह यांचे ओवेसींना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 03:17 PM2022-02-07T15:17:54+5:302022-02-07T15:18:52+5:30
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली.
नवी दिल्ली-
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली. हापुड येथे ओवेसी यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता आणि प्रशासनाला देखील याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तरीही ओवेसी यांना माझी विनंती आहे की त्यांनी सरकारकडून दिली जाणारी सुरक्षा स्वीकार करावी, असं अमित शाह म्हणाले.
ओवेसींवर झालल्या हल्ल्याची माहिती देताना अमित शाह म्हणाले की ३ फेब्रुवारी रोजी २०२२ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता खासदार ओवेसी जनसंपर्क करुन घरी परतत होते. त्यावेळी दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. या घटनेचे तीन साक्षीदार देखील आहेत. संपूर्ण घटनेबाबत पिलखुवा येथे एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे आणि याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे, असं अमित शाह म्हणाले.
हापुड येथे ओवेसींचा कोणताही कार्यक्रम नव्हता- शाह
समोर आलेल्या माहितीनुसार हापुड येथे ओवेसी यांचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता किंवा कोणत्याही कार्यक्रमाची स्थानिक प्रशासनाला देखील कल्पना देण्यात आली नव्हती. ओवेसी सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचले. सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. ओवेसी यांच्यासोबत सुरक्षा देण्याबाबतची चर्चा देखील झाली. त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याचं मूल्यांकन करुन झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पण त्यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे, अशीही माहिती शाह यांनी संसदेत दिली आहे.