अमित शाह उद्या तेलंगणाच्या दौऱ्यावर, एसएस राजामौली यांचीही भेट घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:32 PM2023-06-14T15:32:41+5:302023-06-14T15:33:14+5:30
बुधवारी रात्री अमित शाह एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचतील. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये गुरुवारी अमित शाह जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी (15 जून) चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात तेलंगणा भाजपच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, एसएस राजामौली 'आरआरआर' आणि 'बाहुबली' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.
बुधवारी रात्री अमित शाह एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचतील. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये गुरुवारी अमित शाह जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. याचबरोबर, अमित शाह हे राजामौली आणि राज्यातील काही प्रमुख लोकांना भेटतील. त्यांचा तेलंगणा दौरा हा भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या जनसंपर्क अभियानाचा एक भाग आहे, असे तेलंगणा भाजपचे प्रवक्ते एनव्ही सुभाष म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह हैदराबादहून हेलिकॉप्टरने भद्राचलमला पोहोचतील आणि श्री राम मंदिरात विशेष प्रार्थना करतील. तेथून भाजपचे वरिष्ठ नेते खम्मम येथे पोहोचतील आणि आंध्र प्रदेशचे (अविभाजित) माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर जाहीर सभेत सामील होतील.
सार्वजनिक सभेला संबोधित केल्यानंतर अमित शाह हे विजयवाडा येथे जातील आणि रात्री अहमदाबादला जातील. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला पर्याय म्हणून उदयास येण्याचे लक्ष्य ठेवून अमित शाह यांच्या रॅलीला यश मिळावे, याकडे भाजपचे लक्ष आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात अमित शाह यांनी 'आरआरआर' स्टार ज्युनियर एनटीआरची येथे भेट घेतली होती. तर या वर्षी मार्चमध्ये अमित शाह यांनी अभिनेता राम चरण आणि त्याचे वडील तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज चिरंजीवी यांचीही भेट घेतली होती.