अमित शाहा सौरव गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:20 PM2022-05-06T13:20:58+5:302022-05-06T13:22:06+5:30
Amit Shah to meet Sourav Ganguly: अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
कोलकाता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा सध्या तीन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, अमित शाह या दौऱ्यात भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. गांगुलींची भेट घेण्यासाठी शाहा त्यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. आता या भेटीच्या चर्चेदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सौरव गांगुलीला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी अमित शाहा आणि सौरव गांगुलीं यांच्यातील संभाव्य भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, पाहुण्यांचं स्वागत करणे ही पश्चिम बंगालची संस्कृती आहे. अमित शाहांनी सौरव गांगुलींची भेट घेतली तर मी अमित शाहा यांना मिष्टी दोही (गोड दही) खायला द्या, असे सौरव गांगुलींना सांगेन, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
मिळत असलेल्या माहितीनुसार अमित शाहा हे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गांगुलींची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी येण्याची शक्.ता आहे. तत्पूर्वी अमित शाहा संध्याकाळी सहा वाजता व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये होणाऱ्या कर्यक्रमात सहभागी होणार आहेत. तिथे डोना गांगुली यांचा विशेष सहभाग असेल. डोना गांगुली यांच्यासोबतच ते सौरव गांगुली यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर सौरव गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असून, त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र ऐन निवडणुकीपूर्वी सौरव गांगुली आजारी पडले आणि ही चर्चाही मागे पडली. आता भाजपाची नजर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर असून, सौरव गांगुलींची साथ मिळाल्यास २०१९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करता येईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे.