UP Election 2022: BJP चा मेगा प्लान! यूपी निवडणुकीपूर्वी १.५ कोटी सदस्य जोडण्याचे लक्ष्य; अनेकांचा पत्ता कट होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:17 PM2021-10-26T15:17:36+5:302021-10-26T15:18:39+5:30
UP Election 2022: BJP नेही मोठी रणनीती आखायला सुरुवात केली असून, निवडणुकीपूर्वी सुमारे दीड कोटी नवे सदस्य जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
नवी दिल्ली: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असून, काही पक्षांनी आघाडीची घोषणाही केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपविरुद्ध अन्य सर्व पक्ष असा खेळ रंगताना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता BJP नेही मोठी रणनीती आखायला सुरुवात केली असून, निवडणुकीपूर्वी सुमारे दीड कोटी नवे सदस्य जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) लखनऊ दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री अमित शाह २९ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती मिळाली आहे. या दौऱ्यादरम्यान अमित शाह भाजपच्या मेगा सदस्यता अभियानाची सुरुवात करतील. तसेच पक्षातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीसाठीची रणनीती आखणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे अनेक नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर पत्ते कट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक आमदारांची तिकिटे कापली जाणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ज्या आमदारांची कामगिरी मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे तसेच जे आमदार पराभूत होण्याची शक्यता आहे, अशा सर्वांचा पत्ता आगामी निवडणुकीत कट होईल, असे सांगितले जात आहे.
खासदार, मंत्री, आमदार अभियानाचे नेतृत्व करणार
उत्तर प्रदेश भाजप यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सदस्यता अभियान राबवले जाणार असून, यामध्ये सुमारे १.५ कोटी नवीन सदस्य जोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आताच्या घडीला भाजपचे उत्तर प्रदेशमध्ये २.३ कोटी सदस्य आहेत. या अभियानाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते, खासदार, मंत्री, आमदार करणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम योगी सरकार करत असून, पक्षाचे सदस्य होण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.