"... तेव्हा अमित शहांना हद्दपार केलं होतं, तर मोदींचीही CBI चौकशी झाली होती"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:14 AM2023-05-23T11:14:53+5:302023-05-23T11:15:56+5:30
ईडीच्या कार्यालयापासून जवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाटील हे चालतच गेले
इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग ॲण्ड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल ॲण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) साडेनऊ तास चौकशी केली. रात्री साडेनऊच्या सुमारास ते ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. केंद्र सरकारकडून विरोधकांना लक्ष्य करण्यात येत असून जाणीवपूर्वक तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीकाही करण्यात येत आहे. त्यावर,आता केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील उदाहरण दिलं आहे.
ईडीच्या कार्यालयापासून जवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाटील हे चालतच गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. उपलब्ध माहितीनुसार, २००८ ते २०१४ या कालावधीमध्ये आयएल ॲण्ड एफएस समूहातील काही कंपन्यांनी सरकारकडून पायाभूत सुविधांचे काम प्राप्त केले होते आणि ते काम करण्यासाठी उपकंत्राटदार नेमले. यासंदर्भातील विषयावरुन ईडीकडून जयंत पाटील यांची चौकशी सुरू आहे. आता, याप्रकरणावरुन विरोधक मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यावर, दानवे यांनी मोदी-शहांचं उदाहरण देत या तपास यंत्रणा स्वायत्तपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे.
ईडीला जयंत पाटलांकडे काही तरी सापडलं असेल म्हणून त्यांची चौकशी सुरु असेल, अशी प्रतिक्रिया मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मात्र, ईडी असो सीबीआय असो या स्वायत्त संस्था असून सरकार यांचा वापर करत नाही, असे दानवे यांनी म्हटले. जालना जिल्ह्यातल्या अंबड येथील एका कार्यक्रमानंतर दानवे पत्रकारांशी बोलत होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सीबीआयनं चौकशी केली होती. अमित शाह यांनाही हद्दपार केल होतं. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. आम्ही कधी काँग्रेसवर आरोप केला नाही. अशा वेळी आमच्यावर आरोप करणं हे राजकारण आहे. ईडीच्या कारवाईवरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे म्हणत दानवे यांनी जयंत पाटलांवर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली.