अधिवेशनात विरोधकांचे लक्ष्य अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:41 AM2020-02-29T02:41:56+5:302020-02-29T02:42:52+5:30
हिंसाचार गाजणार; सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस राजीनामा मागणार
नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात दिल्लीतील हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसºया सत्रात शहा या हिंसाचाराविषयी काय बोलतात, याकडे सर्र्वाचे लक्ष आहे.
यानिमित्ताने नागरकत्व दुरूस्ती कायदा, एनआरसी व एनपीआर यांवरही जोरदार चर्चा अपेक्षित आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ४२ जण मरण पावले आहेत. केंद्राला हिंसाचार थांबवण्यात अपयश आले, अशी टीका आम आदमी पक्ष व काँग्रेस करीत आहेत. दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्र्यांवर असते. अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळाने राष्टपतींचीदेखील भेट घेतली. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळेच हिंसाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांनीही भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्याचेच पडसाद अधिवेशनात उमटतील.
अमित शहाही तयारीत
अमित शहा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.
सीएएविरोधी आंदोलकांना विरोधी पक्षांनी चिथावणी दिल्याचा थेट आरोप ते सभागृहात करतील, असे समजते.
बैठकीत ठरणार रणनीती
अधिवेशनाआधी विरोधी पक्षांच्या बैठकीत रणनीती ठरेल. लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तर राज्यसभेत माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा भाषण करतील.
तृणमूलकडून कल्याण बॅनर्जी यांना पुढे करण्यात येईल. शहा यांच्यावर टीका करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधण्याचे विरोधकांनी ठरवले आहे.