अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:46 AM2019-06-07T03:46:11+5:302019-06-07T03:46:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पूर्वी वास्तव्याला असलेल्या बंगल्यात राहाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना हा बंगला मंजूर केला आहे. दिल्लीतील ६ ए, कृष्ण मेनन मार्ग हा अमित शहा यांचा नवीन पत्ता असेल.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांना हा बंगला मिळाला होता.
अटलबिहारी वाजपेयी अखेरपर्यंत राहात असलेला शासकीय बंगला दिल्लीच्या ल्यूटन भागात आहे. तिथे त्यांचे सुमारे चौदा वर्षे वास्तव्य होते. २००४ साली लोकसभा निवडणुकांत भाजप हरल्यानंतर वाजपेयी यांनी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सोडले व ते या बंगल्यात राहायला आले होते. वाजपेयी यांना भेटण्यासाठी अनेक दिग्गज व भाजप नेते ६ ए, कृष्ण मेनन मार्ग येथील बंगल्यामध्ये नेहमी येत असत.
भारतरत्न सोहळ्याचा साक्षीदार
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात वाजपेयी यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न किताब प्रदान करण्याचा समारंभ ६ ए, कृष्ण मेनन मार्ग येथील बंगल्यातच पार पडला होता. वाजपेयींच्या निधनानंतर या बंगल्यात त्यांचे स्मारक करावे, अशी काही जणांनी केलेली मागणी सरकारने मान्य केली नव्हती.