अमित शाह आज बोलणार; भाजपने १६ नेत्यांना मैदानात उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:53 AM2023-08-09T05:53:45+5:302023-08-09T05:54:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने या चर्चेचा समारोप होईल.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मणिपूरच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संसदेत उत्तर देण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांना पंतप्रधानांच्या आधी आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसंसदेत मणिपूरबाबत उत्तर देणार आहेत. अमित शाह यांचे उत्तर काँग्रेसला महागात पडणार असून, त्यांनी मणिपूरच्या घटनांबाबत काँग्रेसच्या माजी सरकारांना जबाबदार ठरवले आहे.
संसद अधिवेशनाआधीपासूनच मणिपूरच्या घटनेबाबत पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी विरोधक करीत आहेत. हे निवेदन न आल्यामुळे पंतप्रधानांनी याबाबत बोलावे यासाठी अंतिम शस्त्र म्हणून विरोधकांनी संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान मोदी लोकसभेत या प्रस्तावाला उद्या, गुरुवारी दुपारी चार वाजता उत्तर देणार आहेत. परंतु, पंतप्रधानांच्या आधी मणिपूरच्या संपूर्ण घटनाक्रमावर अमित शाह अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बुधवारी बोलणार आहेत. त्यांचे उद्याचे निवेदन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
जोरदार तयारी
मणिपूरबाबतच्या तयारीसाठी आजही अमित शाह यांनी मणिपूरच्या नेत्यांना संसद भवनातील आपल्या कक्षात बोलावले होते. मणिपूर सरकारच्या काही मंत्र्यांनाही दिल्लीत बोलावले होते.
तीन दिवस, १७ तास चालणाऱ्या या अविश्वास प्रस्तावावर बोलण्यासाठी सत्ताधारी भाजपने आपल्या १६ नेत्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजीजू, भाजप सरचिटणीस बंदी संजय, भाजप खा. लॉकेट चटर्जी, राम कृपाल यादव, राजदीप राय, विजय बघेल, रमेश विधुरी, सुनीता दुग्गल, हीना गावित, निशिकांत दुबे, राज्यवर्धन सिंह राठौर यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने या चर्चेचा समारोप होईल.
सीएम कार्यालयातून फोन...
मणिपूरची परिस्थिती अमली पदार्थावरून निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात; परंतु, ड्रगमाफियाला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच त्याच्या सुटकेसाठी निरोप येतो, असा आरोप काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केला.