अमित शाह, योगी की गडकरी; PM नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? देशवासीयांचे म्हणणे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:44 AM2024-08-23T10:44:28+5:302024-08-23T10:48:17+5:30
Who Will Be The Successor Of Narendra Modi: राजनाथ सिंह आणि शिवराज सिंह चौहान यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून, दक्षिण भारतातूनही अमित शाह यांना समर्थन मिळाले आहे.
Who Will Be The Successor Of Narendra Modi: अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपला प्रत्यक्षात मात्र २४० जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएमधील घटक पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. गेल्या अनेक काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. एका सर्व्हेत याबाबत अंदाज घेण्यात आला. या सर्व्हेत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाच्या नावाला पसंती दिली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात २५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह यांना पंतप्रधानपदी पसंती दिली आहे. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावांना पसंतीक्रम देण्यात आला आहे.
दक्षिण भारतातही अमित शाह यांच्या नावाला समर्थन
पंतप्रधानपदासाठी योगी आदित्यनाथ यांना १९ टक्के मते मिळाली आहेत. तर नितीन गडकरी यांना १३ टक्के मते मिळाली आहेत. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना ५ टक्के मते मिळाली आहेत. इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत अमित शाह यांचे नाव आघाडीवर असले तरी ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या सर्व्हेंच्या तुलनेत कमी रेटिंग मिळाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व्हेंमध्ये अमित शाह यांना २८ आणि २९ टक्के मते मिळाली होती. इतकेच नाही तर दक्षिण भारतातील जनतेने अमित शाह यांच्या नावाला प्राधान्यक्रम दिला होता. त्यांना ३१ टक्के जनतेचे समर्थन मिळाले होते.
योगी आदित्यनाथ यांना पसंती घटली, राजनाथ सिंह यांना समर्थन वाढले
गेल्या दोन सर्व्हेंच्या तुलनेत संरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांना जनतेचे समर्थन वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. तर योगी आदित्यनाथ यांची पसंती घटल्याचे दिसत आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये २५ टक्के तर फेब्रुवारी २०२४ मध्ये २४ टक्के जनतेने योगी आदित्यनाथ यांना समर्थन दर्शवले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सर्व्हेत १.२ टक्क्यांनी राजनाथ सिंह यांची लोकप्रियता वाढली. तर शिवराज सिंह चौहान यांच्या लोकप्रियतेत ५.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूड ऑफ द नेशन सर्व्हे १५ जुलै ते १० ऑगस्ट २०२४ या दरम्यान घेण्यात आला होता.