तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेल्या वादाबाबत अमित शाहांचे मोठे विधान, म्हणाले...
By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 08:20 PM2020-10-17T20:20:40+5:302020-10-17T20:24:43+5:30
Amit Shah's Statement on Tanishq ad controversy : तनिष्कच्या जाहीरातीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असलेल्या तनिष्कने प्रसारित केलेल्या एका जाहिरातीवरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या जाहिरातीबाबत बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, तनिष्कच्या या जाहीरातीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. भारताची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अशा किरकोळ घटनांमुळे देशातील सामाजिक सद्भावनेला धक्का लागणार नाही, असे विधान अमित शाह यांनी केले आहे.
न्यूज १८ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे विधान केले आहे. त्यात अमित शाह म्हणाले की, भारतात सामाजिक समरसतेची पाळेमुळे भक्कम आहेत. त्यावर असे हल्ले करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. इंग्रजानींसुद्धा हा सद्भाव तोडण्याचा प्रयत्न केला. पुढे काँग्रेसनेसुद्धा तसाच प्रयत्न केला, असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी ओव्हरअॅक्टिव्हिझमविरोधात इशारासुद्धा दिला. ते म्हणाले की, मला वाटते की, अतिसक्रियतेचे कुठलेही रूप असता कामा नये.
नेमका काय झाला होता वाद
तनिष्कने आपल्या नव्या ज्वेलरी कलेक्शनच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात एक नवी जाहिरात प्रसारित केली होती. ही जाहिरात प्रसारित होताच त्यावरून वादाला तोंड फुटले होते. 43 सेकंदाच्या या जाहिरातीत मुस्लिम कुटुंबात लग्न करून गेलेल्या हिंदू तरूणीसाठी तिच्या सासरचे लोक हिंदू प्रथेप्रमाणे डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेतात. तनिष्कने युट्यूबवर ही जाहिरात पोस्ट केली होती. ह्यतिच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करणाऱ्या घरात ती लग्न होऊन गेली. तिच्यासाठीच त्यांनी त्यांच्यात सहसा साजरा न होणारा सोहळाही साजरा केला. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाफ आहे, ह्णअसे ही जाहिरात पोस्ट करताना लिहिण्यात आले होते.