'मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही...'; अमित शाहांची नाराजी फक्त रणनीतीचा भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 12:04 PM2020-02-15T12:04:12+5:302020-02-15T12:07:50+5:30
भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर प्रचारात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे. बिहारमध्ये लगेच जी तातडीची गरज आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केली व त्यांनी अमित शहा यांच्यासोबत प्रचारही केला. तरी भाजपच्या नेत्यांनी कडव्या हिंदुत्वाचा केलेला प्रचार हा त्यांना रुचलेला नाही. नितीश कुमार यांना ‘सुशासन बाबू’ असे बिहारमध्ये समजले जाते. कुमार यांची कामगिरी आणि अल्पसंख्य काही प्रमाणात का असेना आपल्या बाजूला त्यांनी ठेवल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला त्यांच्यात पराभूत करण्याची क्षमता आहे. अमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही. दुसरे म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारमध्ये द्वेषाच्या कोणत्याही भाषणांना मुभा नाही, असा स्पष्ट इशारा आधीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी शांततेचा राग आळवला. परंतु शहा यांनी घेतलेली भूमिका ही तात्पुरती असून, बिहारमधील निवडणूक संपल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुड्डुचेरीत होणाऱ्या निवडणुकीत भाजप आपल्या जुन्या कार्यक्रमासह सक्रिय होईल.
>भाजपच्या भूमिकेमागचे राजकारण काय?
येत्या सहा महिन्यांत बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तेथे भाजप जनता दलाचा (संयुक्त) कनिष्ठ भागीदार.
या सगळ्यात कडी म्हणजे भाजपने स्वत:चा द्वेष पसरवणारा कार्यक्रम बिहारमध्ये सुरूच ठेवला तर लोक जनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांनीही आम्ही भाजपसोबत असणार नाही, असे म्हटले. त्यामुळे विद्यमान खासदार आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनी ‘गोली मारो आणि भारत-पाकिस्तान मॅच’ आदी केलेल्या वक्तव्यांचा अमित शहा यांनी निषेध करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
पराभवानंतर तीन दिवसांनी जाहीरपणे अमित शहा यांनी त्या वक्तव्यांचा निषेध केला त्याचे कारण म्हणजे बिहारमधील मित्रपक्षांनी वाजवलेली धोक्याची घंटा, असे भाजपमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये आपण जनता दलाचे (संयुक्त) कनिष्ठ सहकारी असून जनता दल किंवा लोक जनशक्ती पक्ष या विषयावर काही तडजोड करणार नाही याची भाजपला जाणीव आहे.