2019 लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहांचा मास्टर प्लान
By admin | Published: September 8, 2016 08:45 AM2016-09-08T08:45:36+5:302016-09-08T08:48:43+5:30
अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला होता अशा 200 जागांपैकी 115 जागांची यादी तयार केली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढील लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी आत्तापासूनच सुरु केली आहे. अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला होता अशा 200 जागांपैकी 115 जागांची यादी तयार केली आहे. या 115 जागांवर विजय मिळवणे शक्य असून त्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेशही अमित शहांनी दिले आहेत. 282 जागांसोबत सत्ता काबीज केल्यानंतर मे 2014 मध्ये भाजपाने केंद्रात आपलं सरकार स्थापन केलं होतं. 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीतही बहुमत मिळवण्यासाठी भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
अमित शहा यांनी एक महिना अगोदरच या मोहिमेला सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये अमित शहा यांनी ओडिशा, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्ये, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडूच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपाचा पराभव झालेल्या 115 जागांवर चर्चा करण्यात आली. पराभव झालेल्या मतदारसंघातील जागांवर विजय कसा मिळवता येईल याची रणनीती यावेळी ठरवण्यात आली. पक्षातर्फे या राज्यांमध्ये कोअर कमिटीची स्थापनादेखील करण्यात आली आहे, ज्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अॅक्शन प्लान सादर करायचा आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड भाजपाचे गड आहेत. याठिकाणी मिळणारी मतं नक्की असून ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सोबतच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांनी 2014 मध्ये केलेली कामगिरी निवडणुकीत खालावली तर या 115 जागांच्या माध्यमातून त्यांची भरपाई करता येईल. भाजपाला पुढील निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत यायचं असेल तर इतर राज्यांमध्येही यश मिळवणं तितकच महत्वाचं ठरणार आहे.
राज्यातील प्रमुख नेत्यांवर कोअर कमिटीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ओडिशामध्ये अरुण सिंग, तामिळनाडूमध्ये मुरलीधर राव, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशमध्ये सिद्धार्थ नाथ सिंग आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हेमंत बिसवा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे भाजपाच्या आशा उंचावल्या आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे पक्ष 2014 मध्ये कामगिरी केलेल्या राज्यांवर लक्ष ठेवणार आहे तर दुसरीकडे भाजपाध्यक्ष इतर राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याची रणनीती आखणार आहेत.