अमित शहांचे पुत्र ठोकणार १०० कोटींचा दावा , कंपनीची उलाढाल १६ हजार पटीने वाढल्याचा ‘द वायर’ वेबसाइटचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 03:26 AM2017-10-09T03:26:16+5:302017-10-09T03:26:36+5:30
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्या मालकीच्या कंपनीची उलाढाल तब्बल १६,००० पटींनी वाढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि भाजपा आमनेसामने उभे ठाकले आहेत.
नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्या मालकीच्या कंपनीची उलाढाल तब्बल १६,००० पटींनी वाढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि भाजपा आमनेसामने उभे ठाकले आहेत.
शहा यांचे चिरंजीव जय यांनी या प्रकरणाचा भंडाफोड करणारी वेबसाइट ‘द वायर’ विरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे,’ असा आरोप जय यांचा बचाव करण्यासाठी समोर आलेले केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. ‘द वायर’ आणि तिच्या रिपोर्टविरुद्ध १०० कोटींचा फौजदारी मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही गोयल यांनी दिला.
गोयल पुढे म्हणाले, जय हे कायद्याचे पालन करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्या कंपनीत सर्व व्यवहारांचा हिशेब कायद्यानुसार केला जातो. त्यांना बँकेकडून कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांना ‘अनसेक्युअर्ड’ कर्ज घ्यावे लागले. जे कर्ज घेतले ते त्यांनी सव्याज टीडीएस वजा करून फेडलेले आहे.
दरम्यान, जय अमित शहा यांनीही एक निवेदन प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे. ही बातमी छापणाºया वेबसाइटचा लेखक, संपादक आणि मालक यांच्याविरुद्ध आपण १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जय यांनी जाहीर केले आहे.
१६ कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज
जयच्या कंपनीच्या‘टर्नओव्हर’मधील वाढीचे कारण १५ कोटी ७८ लाख रुपयांचे असुरक्षित कर्ज आहे. राजेश खंडवाल यांच्या ‘फायनेन्शिअर सर्व्हिसेस फर्म’ने हे उपलब्ध करून दिले आहे. खंडवाल हे भाजपाचे खासदार व रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी परिमल नथवानी यांचे व्याही आहेत.
५१ कोटी रुपयांचे विदेशी उत्पन्न दाखविले
२०१३-१४ मध्ये जयच्या कंपनीकडे कुठलीही अचल संपत्ती नव्हती आणि ‘स्टॉक’देखील नव्हता. कंपनीला त्या वर्षी ५ हजार ७९६ रुपयांचा आयकर परतावा मिळाला होता. संकेतस्थळ ‘द वायर’नुसार, त्यानंतर कंपनीच्या एकूण संपत्तीची किंमत २ लाख रुपये झाली. त्यासोबतच कंपनीने व्यापारासाठी एकूण २ कोटी ६५ लाख रुपयांचे देयक अदा केले. याअगोदरच्या वर्षात हा आकडा अवघा ५ हजार ६१८ रुपये इतका होता. मागील वर्षी शून्य असलेले विदेशी उत्पन्न कंपनीने यंदा ५१ कोटी रुपये इतके दाखविले आहे.
पंतप्रधान सीबीआय चौकशी करतील काय-सिब्बल
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचे चिरंजीव जय यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेऊन काँग्रेस, डावे पक्ष व आप यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हा भांडवलशाहीचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करतील काय, असा प्रश्न विचारला आहे.
सिब्बल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना मोदी यांना घेरले. पंतप्रधानांचे या भांडवलशाहीबद्दल काय म्हणणे आहे. ते या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करतील काय? अंमलबजावणी संचालनालयाला दोषी व्यक्तींना अटक करण्याचे आदेश देतील काय? असे प्रश्न सिब्बल यांनी विचारले.
२०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर जय यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस कंपनीतील आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाल्याचा दावा द वायर वेबसाईटवरील बातमीत करण्यात आला आहे. कंपनीच्या संपत्तीमध्ये २०१५-२०१६ या वर्षात १६ हजार टक्के वाढ झाली तर, त्यापूर्वीच्या वर्षी कंपनीला सुमारे ८० कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनी निबंधकाच्या आकडेवारीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडले आहे.
या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते डी. राजा यांनी केली आहे.
आम आदमी पार्टीनेही भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. फौजदारी चौकशी व्हायलाच पाहिजे, असे या पक्षाने म्हटले आहे.