अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 02:58 AM2018-08-02T02:58:15+5:302018-08-02T02:59:08+5:30
आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे.
नवी दिल्ली/कोलकाता : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षापश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ११ आॅगस्ट रोजी कोलकात्याच्या सभेला जाणार असल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
शहा यांच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आधी ती नाकारल्याचे वृत्त होते. भाजपाने सभेची परवानगी मागितलीच नव्हती, असे पोलीस सांगत होते. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळताच पश्चिम बंगालमध्ये खरे नागरिक शोधण्याची गरज असल्याचे मत तेथील भाजपा नेत्यांनी व्यक्त केले होते. बंगालमध्ये बांग्लादेशींना आश्रय मिळत असल्याचा आरोपही केला होता. त्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या सभेने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एनआरसी प्रसिद्ध झाल्यानंतरचा शहा यांचा पहिलाच दौरा आहे. जूनमधील दौºयात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात हिंसक कारवाया करीत असल्याचा आरोप केला होता.
माजी राष्ट्रपतींचे कुटुंबीयही वगळले
माजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा पुतण्या झियाउद्दिन अली अहमद व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावेही एनआरसीमध्ये नाहीत. माझ्या वडिलांचे नाव एनआरसीमध्ये नसल्याने आमच्याही नावांचा त्यात उल्लेख नाही. फक्रुद्दिन अली अहमद यांच्या कुटुंबीयांशीही आपण संपर्क साधला असल्याचे झियाउद्दिन यांनी सांगितले.
भारत-बांग्लादेश
संबंध बिघडतील
भाजपा एनआरसीद्वारे मतपेटीचे राजकारण करत असून, त्यामुळे भारताचे बांग्लादेशशी संबंध बिघडतील असा दावा करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, १९७१ सालापासून मी व माझे कुटुंबीय भारतात राहत असल्याचे पुरावे माझ्याकडेही नाहीत. मला माझ्या पालकांची जन्मतारीख माहीत नाही, तिथे मी मी त्यांचे वास्तव्य कसे काय सिद्ध करणार?
रेल रोको : एनआरसीच्या विरोधात आॅल इंडिया मातुआ महासंघ या मागासवर्गीयांच्या संघटनेने पूर्व रेल्वेच्या अनेक स्थानकांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता रेल रोको आंदोलन केले. एनआरसीमुळे असंख्य लोकांचे देशातून उच्चाटन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनेने केला. या आंदोलनामुळे पूर्व रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.