अमिताभ बच्चन, रजनीकांतना डावलून झाली गजेंद्र चौहान यांची नियुक्ती
By admin | Published: July 11, 2015 10:22 AM2015-07-11T10:22:23+5:302015-07-11T10:22:23+5:30
अमिताभ, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा आणि श्याम बेनेगल यांना डावलून गजेंद्र चौहान यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे समोर आले
ऑनलाइन लोकमत
अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा आणि श्याम बेनेगल यांचे नाव मूळ प्रस्तावात होते, परंतु त्यांना डावलून गजेंद्र चौहान यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे समोर आले असून त्यामुळे या वादाला नवा पैलू मिळाला आहे. FTII ला उत्कृष्ट संस्था बनवण्यासाठी कोण सहाय्य करू शकेल अशी यादी डिसेंबरमध्ये माहिती व प्रसारण खात्याने बनवली. या यादीमध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा, श्याम बेनेगल, अनुपम खेर अशा दिग्गजांची नावे होती. मात्र, केंद्र सरकारने या सगळ्या नावांचा विचार न करता भाजपाशी निगडीत असलेल्या गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केली. इतकेच नव्हे तर अध्यक्षांना सहाय्य करणा-या समितीमध्ये प्रस्तावित असलेल्या कलाकारांच्या जागी भाजपाशी संबंधित असलेल्या अन्य कलाकारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचे समोर येत आहे.
मात्र, जवळपास चार आठवडे FTII च्या विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करत संपावर जाण्याचा मार्ग स्वीकारला असून अनुपम खेर, रणबीर कपूर, संतोष सिवन, ऋषी कपूरसारख्या दिग्गज्जांनीही विद्यार्थ्यांची बाजू घेतल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे ही नियुक्ती सरकारने केली असल्यामुळे मी आपणहून राजीनामा देण्याचा प्रश्न येत नसल्याचे व आपण हे काम करण्यास पात्र असल्याची भूमिका चौहान यांची आहे.
अनेक दिवस चिघळलेला हा वाद कसा मिटतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.