अमिताभ बच्चन, मुकेश अंबानींचे फोटो मॉर्फ करून गंडा; घोटाळेबाज चिनी ॲपचा म्होरक्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:29 AM2023-08-18T05:29:44+5:302023-08-18T05:30:25+5:30
सेलिब्रेटींचे मॉर्फ केलेले फोटो वापरून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
अंबिका प्रसाद कानुनगो, लोकमत न्यूज नेटवर्क, भुवनेश्वर : चिनी ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या एस. चित्रवेल (३१) या भारतातील म्होरक्याला ओडिशा क्राइम ब्रँचच्या आर्थिक गुन्हे शाखेने तामिळनाडूमधून अटक केली. अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, रतन टाटा, सचिन तेंडुलकर, टेक्निकल गुरुजी (प्रसिद्ध यूट्यूबर) आणि ऊर्फी जावेदसारख्या सेलिब्रेटींचे मॉर्फ केलेले फोटो वापरून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
१४ ऑगस्ट रोजी अवियूर येथून त्याला गजाआड करण्यात आले असून, त्याला १६ रोजी कटकच्या ओपीआयटी कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्याला पाच दिवसांची रिमांड देण्यात आली आहे. बँक खाती, शेल कंपन्या, फर्म आणि क्रिप्टो-ट्रेडर्सचा वापर करून भारतात हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पॅन-इंडिया ऑनलाइन पाँझी घोटाळ्याशी हे प्रकरण संबंधित आहे.
कर्जाच्या ॲपच्या जाळ्यात अडकलेल्या काही जणांनी आत्महत्या केल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी कारवाई करण्यास सुरुवात केली व सरकारनेही अशा ॲपवर बंदी घातली. यानंतर घोटाळेबाजांनी कमी वेळेत पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे आश्वासन देऊन लोकांना फसवण्यास सुरुवात केली. कारवाई टाळण्यासाठी घोटाळेबाजांनी चीनमध्ये ॲप विकसित केले. परंतु, ते भारतीय असल्याचे भासवण्यात आले. या घोटाळ्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये भारताबाहेर नेण्यात आले.