अमिताभ बच्चन यांनी आपलं जुनं घर 'सोपान' विकलं, झाली कोट्यवधींची डील! जाणून घ्या किती आली किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:00 PM2022-02-03T14:00:32+5:302022-02-03T14:00:50+5:30
गुलमोहर पार्कमधील हे दोन मजली घर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे पहिले घर असल्याचे बोलले जाते.
नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दक्षिण दिल्लीतील गुलमोहल पार्कमध्ये असलेले आपले 'सोपान' नावाचे घर विकले आहे. या डीलमधून त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यांनी हे घर जवळपास 23 कोटी रुपयांना विकल्याचे बोलले जाते. या घरात अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन राहत होते.
गेल्या वर्षीच झाले होते रजिस्ट्रेशन -
Nezone ग्रुपचे सीईओ अवनी बदेर (Avni Bader) यांनी अमिताभ यांच्या या प्रॉप्रटीची खरेदी केली आहे. ते बच्चन कुटुंबीयांना गेल्या 35 वर्षांपासून ओळखतात. तसेच ते याच भागात राहतात. Economic Times नुसार, 418 चौरस मीटर एवढ्या विस्तिर्ण जागेवर असलेल्या या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन गेल्यावर्षी 7 डिसेंबरला झाले होते.
ब्लॉगमध्ये अनेक वेळा केला 'सोपान'चा उल्लेख -
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये 'सोपान'चा उल्लेख अनेक वेळा केला, हे घर त्यांच्या आई तेजी यांच्या नावावर होते. इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना अवनी यांनी सांगितले की, हे जुने बांधकाम आहे, आता आम्ही हे पाडून आमच्या गरजेनुसार बांधकाम करू. या भागात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. आम्ही बऱ्याच दिवसांपासून एका नव्या प्रॉपर्टीच्या शोधत होतो आणि जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळाली तेव्हा आम्ही लगेच हो म्हटले.
अमिताभ बच्चन यांचं पहिलं घर! -
गुलमोहर पार्कमधील हे दोन मजली घर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे पहिले घर असल्याचे बोलले जाते. माध्यमांतील वृत्तानुसार, अमिताभ बच्चन मुंबई शिफ्ट होण्यापूर्वी आई-वडिलांसह याच घरात राहत होते. यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले. यामुळे हे घर गेल्या अनेक वर्षांपासून रिकामेच होते.