अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा, चिंतेचे कारण नसल्याचे झाले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:55 AM2018-03-14T04:55:39+5:302018-03-14T04:55:39+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीचे बिग बी अमिताभ बच्चन (७५) जोधपूरमध्ये ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इथे आले असताना, अचानक त्यांची प्रकृती बिघडली.
जोधपूर : हिंदी चित्रपटसृष्टीचे बिग बी अमिताभ बच्चन (७५) जोधपूरमध्ये ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इथे आले असताना, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ते कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठाच धक्का बसला आणि त्यांना नेमका काय त्रास होत आहे, याची चर्चा सर्वत्र सुरू
झाली. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे कळताच, डॉक्टरांचे
पथक चार्टर्ड प्लेनने मुंबईहून येथे आले आणि त्यांना तपासले. डॉक्टरांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्यांची प्रकृती आता बरी आहे, असे टिष्ट्वट त्यांच्या पत्नी खासदार जया बच्चन यांनीच दुपारी केले.
या चित्रपटासाठी त्यांना जो पेहराव करावा लागला, तो वजनाने जड आहे. बहुधा त्याचाच त्यांना त्रास झाला असावा. जया बच्चन यांनीही ती शक्यता व्यक्त केली. अमिताभ यांच्या पाठीत व कमरेत वेदना होत होत्या. पेहरावामुळे अधिक त्रास झाला असावा. औषधोपचारानंतर त्यांना बरे वाटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वत: अमिताभ बच्चन यांनीच मंगळवारी पहाटे ५ वाजता आपल्या ब्लॉगवर प्रकृतीबाबत भाष्य केले होते. आपल्या डॉक्टरांच्या टीमला इथे बोलविण्यात आले आहे. ते माझ्या प्रकृतीत सुधारणा करतील, असे अमिताभ यांनी ब्लॉगवर सांगितल्यानंतर, सकाळपासूनच याबाबत चर्चेला सुरुवात झाली. अमिताभ यांना ताबडतोब मुंबईत आणावे लागल्यास, त्यासाठी विशेष विमानाचीही व्यवस्था करण्यात आली होती. अमिताभ यांना अनेक वर्षे पोटाचा त्रास होत आहे. कुली चित्रपटाच्या वेळी बंगळुरूमध्ये त्यांना अपघात झाला होता, तेव्हापासून त्यांना हा त्रास होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, तिथे एकच गर्दी केली होती.
विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाखाली ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात आमीर खानही मुख्य भूमिकेत आहे. त्याचे जोधपूरमध्ये चित्रीकरण सुरू आहे.
‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाबाबत काही माहिती देऊन अमिताभ यांनी म्हटले आहे की, काही लोकांना जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. येथे संघर्ष आणि निराशा आणि वेदना आहेत... सहजासहजी काही मिळत नाही. या संघर्षातूनच आमच्या अपेक्षा पूर्ण होतील.
>चाहत्यांनी केली प्रार्थना
अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी दिली आहे. दक्षिणी चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांनीही वृत्त कळताच, चिंता व्यक्त केली होती. रजनीकांत सध्या हिमालयात आहेत. तेथून त्यांनी टिष्ट्वट करून चिंता व्यक्त केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनीही अमिताभ यांच्या प्रकृतीविषयी चौकशी सुरू केली. त्यांना लवकरात लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना अनेक चाहत्यांनी केली.