अमिताभ, कंगनाचा अभिनय सर्वोत्कृष्ट

By admin | Published: March 29, 2016 03:55 AM2016-03-29T03:55:34+5:302016-03-29T03:55:34+5:30

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ‘पिकू’ या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी लागोपाठ चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावत अभिनयाचा शहेनशहा हे बिरुद खरे

Amitabh, Kangana's acting best | अमिताभ, कंगनाचा अभिनय सर्वोत्कृष्ट

अमिताभ, कंगनाचा अभिनय सर्वोत्कृष्ट

Next

नवी दिल्ली : मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ‘पिकू’ या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी लागोपाठ चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावत अभिनयाचा शहेनशहा हे बिरुद खरे ठरविले आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने लागोपाठ दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान पटकावला. दिल्लीत सोमवारी घोषित झालेल्या ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी चित्रपटांचा बोलबाला राहिला. बाहुबलीने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विविध श्रेणींचे पुरस्कार पटकावत वर्चस्व राखले.
७३ वर्षीय अमिताभ यांनी पिकू या चित्रपटात एका तापट पित्याची भूमिका बजावली असून रस्त्यावरील छोट्या सफरीत त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू समोर येतात. याआधी त्यांनी अग्निपथ, ब्लॅक आणि पा या चित्रपटांतील भूमिकेवर सर्वोत्कृष्टतेची मोहर उमटवली होती.
गेल्याच आठवड्यात २९ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कंगनाने ‘तनू वेडस् मनू रिटर्न्स’ या रोमँटिक हास्य चित्रपटात अडचणीत सापडलेली पत्नी तनू आणि हरियाणाची क्रीडापटू दत्तो हिची दुहेरी भूमिका वठवताना सहजसुंदर अभिनयाचे दर्शन घडविले. हा पुरस्कार बीग बी अमिताभ यांच्यासोबत मिळाल्यामुळे ही वाढदिवसाची सर्वश्रेष्ठ भेट असल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे. कंगनाने तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार स्वत:च्या नावे केला. २००८ मध्ये फॅशन तर गेल्या वर्षी क्वीन चित्रपटातील भूमिकेसाठी तिने हा पुरस्कार पटकावला होता.

बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट...
रमेश सिप्पी यांच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यीय ज्युरीने एस.एस. राजामौली यांच्या बाहुबलीला सर्वोत्कृष्ट चित्रपट घोषित केले. गेल्यावर्षी खूप चर्चिल्या गेलेल्या ‘मसान’ या चित्रपटाला मात्र पुरस्कारासाठी संघर्ष करावा लागला. चित्रपट दिग्दर्शक नीरज घायवान यांना सर्वश्रेष्ठ नवोदित दिग्दर्शकाच्या पुरस्कारावर समाधान मानावे लागले. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा यांची भूमिका आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. एकूण सहा पुरस्कारही या चित्रपटाच्या झोळीत पडले. बाजीराव मस्तानीमधील एका धूर्त मातेच्या भूमिकेबद्दल तन्वी आझमी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर पिंगा आणि दिवानी मस्तानी या दोन लोकप्रिय गाण्याच्या कोरिओग्राफीबद्दल रेमो डिसूझा यांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. नानक शाह फकीर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी नर्गीस दत्त पुरस्कार पटकावला. शोनाली बोस यांच्या ‘मार्गारेट विथ ए स्ट्रॉ’ या चित्रपटातील सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त मुलीची भूमिका बजावणारी अभिनेत्री कल्की कोचलीन हिने विशेष ज्युरीचा मान मिळविला. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाने तांत्रिक, सिनेमॅटोग्राफीसह सर्वाधिक सहा पुरस्कार पटकावले. शरद कटारिया यांच्या ‘दम लगा के हैशा’ या विजोड जोडप्याची प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाने उत्कृष्ट हिंदी भाषिक चित्रपटाचा मान पटकावला.

मला अमिताभ बच्चन यांच्या सोबतीने हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी ही माझ्या वाढदिवसाची खास भेट मानते. त्यांच्यासोबत हा पुरस्कार स्वीकारणार असल्यामुळे आशीर्वाद लाभल्याची माझी भावना झाली आहे.
- कंगना राणावत,
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.

बाजीराव मस्तानीसाठी दिग्दर्शक या नात्याने पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ही बाब माझ्यासाठी खरेच खूप खास आहे. मी पुरस्कार जिंकावा यासाठी माझी आई नेहमी प्रार्थना करीत होती. मी पुरस्कार जिंकल्याचे कळताच ती आनंदाने ओरडलीच. - संजय लीला भन्साली, चित्रपट दिग्दर्शक.

मी खूप उत्साहित आहे. आम्ही जोखीम पत्करत वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुरस्काराने आम्ही खूप सन्मानित झालो आहोत.
- राणा डुग्गूबट्टी,
अभिनेता, बाहुबली

सलमान खानची भूमिका असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला मनोरंजनासाठीचा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट घोषित करण्यात आला आहे. ‘बजरंगी भाईजान’ने राष्ट्रीय चित्रपटाचा मान पटकावल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही सर्व जण खूप खूश आहोत.
- कबीर खान, चित्रपट दिग्दर्शक

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचाही ठसा असून, रिंगण चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला आहे. ‘पायवाट’ला सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘दारवठा’ या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. अमोल देशमुख यांच्या ‘औषध’ची सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटासाठी तर सर्वोत्कृष्ट गायनासाठी महेश काळे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सैराटमधील भूमिकेसाठी रिंकू राजगुरू यांना विशेष परीक्षक पुरस्कार मिळाला आहे.
- महेश काळे

Web Title: Amitabh, Kangana's acting best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.