अमिताभ, माधुरीला न्यायालयात खेचले
By admin | Published: May 30, 2015 11:40 PM2015-05-30T23:40:08+5:302015-05-30T23:40:08+5:30
शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
बाराबंकी : नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानिकारक घटक आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
बाराबंकीचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.के. पांडेय यांनी सांगितले की, विभागाच्या वतीने वरिष्ठ मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात नेस्ले इंडिया लिमिटेडची हिमाचल प्रदेश शाखा, दिल्लीच्या कनॉट सर्कल येथील नोंदणीकृत कार्यालय, ईझी-डे बाराबंकी, ईझी-डे दिल्ली, ईझी डेचे व्यवस्थापक मोहन गुप्ता आणि शबाब आलम यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याशिवाय संतोषसिंग नावाच्या वकिलाने मॅगीचा प्रचार करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा या तिघांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका केली आहे. चित्रसृष्टीतील नायक-नायिकांना आजची युवापिढी आपला आदर्श मानते. अशात या कलाकारांनी आपल्या स्वार्थाकरिता एक विषारी उत्पादन आरोग्यासाठी पोषक असल्याचा अपप्रचार केला असून त्यांचा हा गुन्हा देशद्रोहाच्या श्रेणीत येतो, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
४अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी १० मार्च २०१४ रोजी येथील ईझी-डे मॉलमधून मॅगीचे काही नमुने तपासणीसाठी पहिले गोरखपूर आणि नंतर कोलकात्याला पाठविले होते. या तपासणीत मॅगीमध्ये आरोग्यास हानिकारक शिसे आणि ग्लुटामेट धोकादायक प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले होते.
४याप्रकरणी खटला भरण्याची परवानगी मागण्यात आली होती ती आता मिळाली आहे.