अमिताभच्या प्राप्तिकराची पुन्हा चौकशी
By admin | Published: May 12, 2016 04:02 AM2016-05-12T04:02:25+5:302016-05-12T04:02:25+5:30
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या १५ वर्षांपूर्वीच्या आणि खास करून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून मिळालेल्या उत्पन्नावरील प्राप्तिकराच्या आकारणीचे पुनर्निर्धारण करण्याचा
नवी दिल्ली : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या १५ वर्षांपूर्वीच्या आणि खास करून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून मिळालेल्या उत्पन्नावरील प्राप्तिकराच्या आकारणीचे पुनर्निर्धारण करण्याचा प्राप्तिकर विभागाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला.
सन २००१-२००२ या करनिर्धारण वर्षासाठी अमिताभ बच्चन यांना लागू होणाऱ्या प्राप्तिकराचे पुनर्निधारण करण्याचा मुंबईच्या मुख्य प्राप्तिकर आयुक्तांचा मूळ निर्णय आणि त्यानुसार केले गेलेले पुनर्निधारण हे दोन्ही मुंबई उच्च न्यायालयाने दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये रद्द केले होते. त्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने केलेली दोन अपिले सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. रंजन गोगोई व न्या. प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने मंजूर केली.
या पुनर्निर्धारण निर्णयाने अमिताभ यांना त्या वर्षात ‘कौन बनेगा करोडपती’मधून मिळालेल्या ३.१७ कोटींंच्या उत्पन्नावर प्राप्तिकर विभागाने १.६ कोटी रुपयांचा प्राप्तिकर आकारला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ही कर आकारणी पुनरुज्जीवित झाली. मात्र तो कर अमिताभना भरावाच लागेल, असे नाही. कारण त्याविरुद्ध प्राप्तिकर अपिली आयुक्तांपासून पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्याचा त्यांचा मार्ग मोकळा आहे.