शिवसेना नेत्यांमध्ये मातोश्रीवर हमरीतुमरी
By admin | Published: September 25, 2014 04:15 AM2014-09-25T04:15:30+5:302014-09-25T04:15:30+5:30
अकोला येथील शिवसेनेचे नेते मातोश्रीबाहेर बुधवारी रात्री हमरीतुमरीवर आले. नेत्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले
मुंबई : अकोला येथील शिवसेनेचे नेते मातोश्रीबाहेर बुधवारी रात्री हमरीतुमरीवर आले. नेत्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. रात्री उशिरा आ. गोपीकिसन बाजोरिया यांना अकोला पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हे अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारीचे दावेदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्योत्स्ना चौरे यांना उमेदवारी दिली जात असल्याचे समजल्यानंतर गावंडे यांच्यासह इतर सगळे दावेदार अस्वस्थ झाले आणि त्यांनी रात्री मातोश्री गाठली. चौरे यांना कोणत्याही परिस्थितीत तिकीट देऊ नका, असे त्यांचे म्हणणे होते.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. गावंडे, आ. गोपीकिसन बाजोरिया, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर आदींनी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि रावते यांची भेट घेतली. चौरे यांच्या उमेदवारीला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या भेटीनंतर रात्री १०.१५च्या सुमारास हे नेते मातोश्रीबाहेर आले. गेटवरच गावंडे आणि पिंजरकर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पिंजरकर आपल्या उमेदवारीला विरोध करत असल्याचा समज झालेले गावंडे यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. गावंडे त्यांच्या अंगावर धावून जात असताना त्यांचे पुत्र संग्राम यांनी वडिलांना बाजूला नेले. बाजोरिया आणि इतरांनी पिंजरकर यांना दुसरीकडे नेले.