पीएनबी घोटाळ्यातील रक्कम १,३२३ कोटींवर, बँकेनेच दिली शेअर बाजाराला माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:48 AM2018-02-28T00:48:52+5:302018-02-28T00:48:52+5:30
नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे.
नवी दिल्ली : नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे.
बनावट हमीपत्रांच्या आधारे मोदी व अन्य सहयोगी कंपन्यांनी हा घोटाळा केला. बनावट हमीपत्रे जारी करून, त्या आधारे भारतीय बँकांच्या विदेशातील शाखांतून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलायचे, ही पद्धत यात वापरण्यात आली. ही सर्व हमीपत्रे पीएनबीच्या मुंबईतील
एका शाखेतून जारी झाली आहेत. तथापि, पीएनबीच्या वहीखात्यात हमीपत्रांची नोंदच केली जात नसल्यामुळे, ही बनवेगिरी वर्षानुवर्षे सुरू राहिली.
पीएनबीने एक दस्तावेज मुंबई शेअर बाजारात सादर केला. त्यात घोटाळ्यातील रक्कम १,३00 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे म्हटले आहे. या दस्तावेजाद्वारे आम्ही असे नमूद करू इच्छितो की, अनधिकृत वित्तीय व्यवहारांतील रक्कम २0४.२५ दशलक्ष डॉलर (अंदाजे) असू शकते, असे बँकेने नमूद केले आहे.
पीएनबीने दिलेला आकडा अमेरिकी डॉलरमध्ये आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार ही रक्कम १,३२३ कोटी रुपये होते. या आधी १४ फेब्रुवारी रोजी बँकेने बीएसईमध्ये दाखल केलेल्या दस्तावेजात घोटाळ्याची रक्कम अंदाजे १.७७ अब्ज डॉलर (११,४00 कोटी रुपये) असल्याचे म्हटले होते.
नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोकसी यांच्या कंपन्यांनी हा घोटाळा घडवून आणला आहे. हे दोघेही हिºयाचे व्यापारी असून, घोटाळा उघडकीस आल्यानंतर ते देश सोडून पळून गेले आहेत.
मोदीच्या कंपनीची अमेरिकेत दिवाळखोरी-
न्यूयॉर्क : भारतात पंजाब नॅशनल बँकेस कोट्यवधींचा गंडा घालणाºया मोदी याच्याच व्यावसायिक साम्राज्याचा भाग असलेल्या ‘फायरस्टार डायमंड््स इनकॉपोॅ.’ या अमेरिकेतील कंपनीने दिवाळखोरी जाहीर करून घेण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
ही कंपनी मोदीच्या
अमेरिकेसह युरोप, मध्य
आशिया व आग्नेय आशियाई देशांतील हिºयांच्या व्यापाराचे काम पाहते. ए. जॅफ्फे इनकॉर्पो. व फॅन्टसी या दोन संलग्न कंपन्यांचाही या दिवाळखोरीच्या दाव्यात समावेश आहे. रोखतेची चणचण व हिरे पुरवठ्यातील अडचणी ही यासाठी कारणे दिली गेली आहेत.
भारतात दाखल झालेल्या फौजदारी फिर्यादींचा या कंपनीशी काहीही संबंध नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्याने पूर्वी म्हटले होते. मोदीकडून बुडविल्या गेलेल्या भारतीय बँकांनी मात्र यावर भाष्य केलेले नाही.