एनआरआय विद्यार्थ्याने भारतीय लष्कराच्या मदतनिधीस दान केली बक्षिसाची रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 10:55 PM2017-08-03T22:55:49+5:302017-08-03T23:02:03+5:30
कुवैतमध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय विद्यार्थ्याने आज आपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम भारतीय लष्कराच्या मदतनिधीस दान करून आपल्यातील देशप्रेमाचा प्रत्यय दिला आहे.
नवी दिल्ली, दि. 3 - देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या भारतीय लष्कराबाबत देशवासियांमध्ये आदर आणि अभिमानाची भावना दिसून येते. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेर राहणारे भारतीयही आपले देशप्रेम वेळोवेळी दाखवत असतात. कुवैतमध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय विद्यार्थ्याने आज आपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम भारतीय लष्कराच्या मदतनिधीस दान करून आपल्यातील देशप्रेमाचा प्रत्यय दिला आहे.
कुवैतमध्ये राहणाऱ्या रिद्धीराज कुमार या विद्यार्थ्याने आपल्याला मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेचा 18 हजार रुपयांचा धनादेश लष्कराच्या मदतनिधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. ऑस्ट्रेलियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च इंटरनॅशनल बेंच मार्क टेस्टमध्ये रिद्धिराज याने बक्षीस जिंकले होते.
रिद्धिराज हा कुवैतमधील इंडियन एज्युकेशनल स्कूलमध्ये शिकत आहे. तसेच गणित आणि विज्ञान या विषयात उत्कृष्ट अध्ययन करत त्याने आतापर्यंत 80 कुवैत दिनार बक्षीस म्हणून मिळवले आहेत. दरम्यान आज त्याने आपल्या आईसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्याने मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेचा 18 हजार रुपयांचा धनादेश लष्कराच्या मदतनिधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला.
दरम्यान, मोदींनी आज महाराष्ट्रातील खासदारांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजे हे सुद्धा उपस्थित होते. संभाजी राजेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.