मोलकरणीच्या बँक खात्यावरील रक्कम ३२ महिन्यांत गेली ७०० रुपयांवरून ७५ लाखांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:40 AM2019-05-30T04:40:16+5:302019-05-30T04:40:23+5:30
मोलकरणीच्या बँक खात्यातील रक्कम ३२ महिन्यांत ७०० रुपयांवरून ७५ लाख रुपयांवर गेली, यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण तसे घडले आहे खरे.
नवी दिल्ली : मोलकरणीच्या बँक खात्यातील रक्कम ३२ महिन्यांत ७०० रुपयांवरून ७५ लाख रुपयांवर गेली, यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण तसे घडले आहे खरे. ही कोणती जादू झालेली नाही किंवा तिला लॉटरीही लागलेली नसून, एका सरकारी अधिकाऱ्याने आपला काळा पैसा लपवण्यासाठी तिच्या बँक खात्याचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
मोलकरीण सरिता आणि ए. के. यादव (पेट्रोलियम विस्फोटक व सुरक्षा संस्था, चेन्नईचे माजी मुख्य नियंत्रक) यांच्याविरुद्ध अवैध मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या सुमारे ३११.३ टक्के अधिक आहे.
सीबीआयच्या अधिकाºयाने सांगितले की, या प्रकरणात टीव्हीके कुमारसेन याचीही भूमिका संशयास्पद असून, त्याने यादव यांच्या एजंटच्या रूपात काम केले आहे. त्याचे नावही गुन्ह्यांत नोंदवण्यात आले आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, यादव यांनी १२ आॅगस्ट २०१५ ते ७ एप्रिल २०१८ या कालावधीत चेन्नईच्या विस्फोटक विभागात संयुक्त मुख्य नियंत्रकाच्या कारकीर्दीत अवैध संपत्ती मिळवली. २०१५ ते २०१८ या कालावधीत त्यांनी आपल्या बँक खात्याबरोबरच मोलकरीण सरिताच्या नावावर १.३७ कोटी रुपयांची संपत्ती जमा केली.
सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आलेल्या आहेत. त्यानुसार, सरिताकडे २०१८ मध्ये ४४.३५ लाखांची अचल व ३०.९४ रुपयांची चल संपत्ती होती. यादव चेन्नईच्या कार्यालयात आले तेव्हा २०१५ मध्ये सरिताच्या खात्यावर केवळ ७०० रुपये होते. यादव यांनी काळा पैसा सरिताच्या नावावर ठेवला, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. यादव हे सरिताला महिना ८,३०० पगार देत होते. २०१५ ते २०१८ या कालावधीत ही रक्कम २.६६ लाख रुपये होते. यादव यांनी काही रक्कम आपल्या पत्नीच्या नावावरही जमा केली आहे.
>मोलकरीण आहे
एवढी श्रीमंत...
सरिताच्या नावावर २९.५० लाख रुपयांचे दोन प्लॉटस् आहेत. तसेच ३६ लाख रुपयांचे एक घर, १०.९४ लाख रुपयांचे ५४७ ग्रॅम दागिने, ६५,१३५ लाख रुपयांची एक स्कूटर व ६.७० लाखांच्या प्रॉमिसरी नोटस व बँकेतील रक्कम तिच्या नावावर जमा आहे.