अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर? अमित शहा यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:17 AM2019-06-25T04:17:10+5:302019-06-25T04:17:51+5:30
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधला असता अमरावतीतील विकासकामांच्या मुद्यावर अमित शहा यांची भेट घेतल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी एका वृत्तसंस्थेला ‘बदल होत असतात’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले होते. त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढविली होती आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारे ठरू शकेल. महाराष्ट्रात काँग्रेसचा एक, तर राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. राणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विरोधी पक्षाची ताकद कमी होईल.
राजकीय हेतू नव्हता
अमित शहा यांची भेट घेण्यात राजकीय हेतू नव्हता. अमरावतीचा विकास या एकमेव मुद्यावर आमची चर्चा झाली. - खासदार नवनीत राणा