उद्यापासून अमृत उद्यान सुरू होणार, जाणून घ्या तिकीट कुठे मिळेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 01:41 PM2024-02-01T13:41:39+5:302024-02-01T13:42:45+5:30
अमृत उद्यानात १०० हून अधिक प्रकारची फुलझाडे लावण्यात आली असून, ती पाहण्यासाठी लोक लांबून येतात.
अमृत उद्यान (Amrit Udyan)म्हणजेच राष्ट्रपती भवनजवळील मुघल उद्यान यंदा २ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत खुले राहणार आहे. दिल्ली किंवा इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, एकदा तरी या उद्यानाला भेट द्यावी. खरंतर, निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आहे, कारण इथली सुंदर झाडं आणि वनस्पती आकर्षणाचं केंद्र आहे.
अमृत उद्यानात १०० हून अधिक प्रकारची फुलझाडे लावण्यात आली असून, ती पाहण्यासाठी लोक लांबून येतात. यंदाची खास गोष्ट म्हणजे यावेळी त्यासाठी एक थीम देखील ठेवण्यात आली आहे. ट्यूलिप गार्डन अशी थीम आहे, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण बाग सजलेली दिसेल. याशिवाय, २२५ वर्षे जुने शीशन वृक्षही येथील आकर्षणाचे केंद्र आहे.
अमृत उद्यानाला भेट देण्याची वेळ
अमृत उद्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले असते. सोमवारी अमृत उद्यान बंद असते. तसेच, दोन महिन्यांत असे चार दिवस असतील, जे विशेष श्रेणीतील लोकांसाठी असतील.
अमृत उद्यान कुठे आहे?
अमृत उद्यान राष्ट्रपती भवनात आहे. येथे प्रवेश गेट क्रमांक १ मधून आहे. राष्ट्रपती भवन ३५, नॉर्थ एव्हेन्यूजवळ आहे, ज्याचा प्रवेश विनामूल्य आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकता
अमृत उद्यानाच्या तिकिटांसाठी तुम्ही visit.rashtrapatibhavan.gov.in वर जाऊन ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. याशिवाय राष्ट्रपती भवनात बसवण्यात आलेल्या किओस्क मशिनमधून किंवा तिथे असलेल्या काउंटरवरूनही तिकीट काढता येईल. येथे प्रवेश विनामूल्य आहे.