जेलर करत होता खलिस्तानी अमृतपाल सिंगला मदत; दिब्रुगड तुरुंगातून स्पाय कॅम अन् फोन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:08 PM2024-03-08T15:08:54+5:302024-03-08T15:09:27+5:30
Dibrugarh Central Jail: खालिस्तानी संघटना ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगला मदत केल्याप्रकरणी जेलरला ताब्यात घेतले आहे.
Dibrugarh Jailor Arrested: आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक(जेलर) निपेन दास यांना शुक्रवारी (8 मार्च) अटक करण्यात आली. दास यांच्यावर 'वारिस पंजाब दे', या खलिस्तानी संघटनेशी संबंधित अमृतपाल सिंग (Amripal Singh) आणि त्याच्या साथीदारांना मदत केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी या कैद्यांकडून स्मार्टफोन, स्पायकॅमसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, तुरुंग अधिकाऱ्याला पहाटेच गुन्हेगारांची मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सध्या त्याला दिब्रुगड सदर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातच दिब्रुगढ सेंट्रल जेलमधून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती.
सिमकार्ड, फोन आणि टीव्हीचे रिमोटही जप्त
लीस महासंचालक (डीजीपी) जी पी सिंग यांनी सांगितले की, तुरुंगाच्या परिसरात झडती घेतली असता सिमकार्डसह स्मार्टफोन, एक सामान्य फोन, कीबोर्डसह टीव्ही रिमोट, स्पायकॅम पेन, पेन ड्राइव्ह, ब्लूटूथ हेडफोन आणि स्पीकर यासारख्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
अमृतपाल सिंगही याच तुरुंगात
खलिस्तान समर्थक संघटना 'वारीस पंजाब दे' (WPD) प्रमुख अमृतपाल आणि त्याचे 10 साथीदार दिब्रुगड तुरुंगात कैद आहेत. या कट्टरपंथी गटावरील कारवाईदरम्यान या लोकांना पंजाबच्या विविध भागांतून राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून हे सर्वजण या तुरुंगात आहेत. या सर्वांना तुरुंगात आणल्यानंतर तुरुंगात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तरीदेखील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे कशी आली, याचा सोध पोलीस घेत आहेत.