अमृतपाल सिंगने पाकिस्तानमधून मागवल्या होत्या रायफली, स्वतःचे सैन्य तयार करण्याचे होते प्लॅनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:29 AM2023-03-27T10:29:18+5:302023-03-27T10:30:35+5:30
Amritpal Singh : सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या.
नवी दिल्ली : 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा अद्याप शोध सुरूच आहे. पाच राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान, अमृतपाल सिंगबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. अमृतपाल सिंगचे जम्मू-काश्मीर कनेक्शन समोर आले आहे. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या.
सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला आपल्या अमृतपाल टायगर फोर्स आणि आनंदपूर खालसा फोर्सच्या सदस्यांना एके ४७ आणि एके ५६ चे प्रशिक्षण द्यायचे होते. इतकेच नाही तर फरारी अमृतपाल सिंग पाकिस्तानच्या निवृत्त मेजरच्या मदतीने आपल्या साथीदारांसाठी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैन्य तयार करण्याचा विचार करत होता. धोकादायक शस्त्रांची ही खेप जम्मू-काश्मीरमधील एका तस्कराच्या माध्यमातून अमृतपाल सिंगपर्यंत पोहोचणार होती.
विशेष म्हणजे, अमृतपाल सिंगला शस्त्रांची डिलिव्हरी मिळाली होती की नाही, याबाबत अद्याप सस्पेंस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांची कारवाई शस्त्रास्त्रांची खेप मिळण्यापूर्वी किंवा त्यादरम्यान सुरू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पंजाब पोलिस अधिकाऱ्यांनी आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आहे.
३५३ जणांपैकी १९७ जणांची सुटका
अमृतपाल सिंगच्या प्रकरणात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या ३५३ जणांपैकी १९७ जणांची पंजाब पोलिसांनी सुटका केली आहे. यातील अनेकांवर पोलिसांनी रासुका लावला होता. पोलिसांनी १८ मार्च रोजी अमृतपाल सिंग आणि त्याच्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली, तेव्हापासून तो फरार आहे. पोलिसांना चकमा देऊन तो वारंवार फरार होत आहे. अमृतपाल सिंगचा ९ राज्यांमध्ये शोध सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.