अमृतपाल, पापलप्रीत सिंगचा पुन्हा गुंगारा, पोलिसांना लागला होता सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 07:52 AM2023-04-02T07:52:13+5:302023-04-02T07:52:35+5:30
दोघे वेगवेगळ्या दिशेने पळाले...
लाेकमत न्यूज नेटवर्क, अमृतसर: फुटीरवादी अमृतपाल सिंग याच्यासोबत सावलीसारखा राहणारा पापलप्रीत सिंग वेगवेगळ्या दिशेने पळाले. अमृतपालच्या पलायनात त्याने मोठी भूमिका बजावली. होशियारपूरमध्ये पोलिसांनी वेढा घातल्यानंतर पापलप्रीत जोगा सिंगसोबत एका दिशेला तर अमृतपाल कारचालकासोबत दुसऱ्या दिशेला पळून गेला होता.
अमृतपाल आणि पापलप्रीत सिंग हे होशियारपूरमध्ये एका वाहिनीला मुलाखत देणार होते. मात्र, पोलिसांना याचा सुगावा लागला. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच अमृतपालच्या साथीदारांनी त्यांची कार मार्नियान गावातील गुरुद्वाराकडे नेली. तेथेही पोलिसांनी चहूकडून घेरल्याचे पाहून सर्वांनी गाडी तेथेच सोडून पळ काढला. पोलिसांना चुकीचे लोकेशन मिळावे म्हणून अमृतपालने त्याचा मोबाइल जोगा सिंगला दिला. त्यानंतर तो कारचालक चरणजित सिंग याच्यासोबत एका दिशेला तर पापलप्रीत सिंग व जोगा सिंग दुसऱ्या दिशेला पळाले. पापलप्रीत सिंग व जोगा सिंग यांनी रात्री होशियारपूरमधील एका डेऱ्यात आश्रय घेतला. तेथील पापलप्रीत सिंगचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज २९ मार्चच्या सकाळचे आहे. रात्रीच्या मुक्कामानंतर दोघे सकाळी लुधियानातील साहनेवाल शहराकडे रवाना झाले. पोलिसांनी लोकेशनच्या आधारे जोगा सिंगला तेथे अटक केली तर पापलप्रीत येथेही पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाला.
जत्थेदारांनी बोलावली शीख पत्रकारांची बैठक
अमृतपालविरुद्धच्या कारवाईदरम्यान अनेक पत्रकारांचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले होते. अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी याबाबत पत्रकारांची विशेष बैठक बोलावली आहे. बैठकीत पत्रकारांविरोधात सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा होणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दमदमा साहिब येथे ही बैठक होणार आहे.
सुमारे ३०० डेऱ्यांची यादी तयार आहे
शोधमोहिमेसाठी पंजाबमधील ३०० हून अधिक डेऱ्यांची यादी तयारी करण्यात आली आहे. जालंधर, कपूरथला, होशियारपूर व भटिंडा येथील डेरे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. अमृतपाल ज्या कारने होशियारपूर येथून पळून गेला होता, तिचा पोलिस शोध घेत आहेत.