अमृतपाल सिंग यांनी घेतली खासदारकीची शपथ, विशेष विमानाने आणले दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 04:48 PM2024-07-05T16:48:59+5:302024-07-05T16:50:43+5:30
Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी आसाममधील दिब्रुगड तुरुंगातून दिल्लीत आणण्यात आले.
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांनी शुक्रवारी खासदार म्हणून शपथ घेतली. आसाममधील दिब्रुगड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अमृतपाल सिंग यांनी पंजाबमधील खांडूर साहिब मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता.
अमृतपाल सिंग यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी आसाममधील दिब्रुगड तुरुंगातून दिल्लीत आणण्यात आले. शपथविधी सोहळ्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. अमृतपाल सिंग यांना आसाममधून थेट विमानाने नवी दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ दिली.
अमृतपाल सिंग यांना लोकसभा खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी न्यायालयाने चार दिवसांचा पॅरोल दिला आहे. न्यायालयाने पॅरोलसाठी विशेष अटी व शर्तीही दिल्या होत्या. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील वास्तव्यादरम्यान अमृतपाल सिंग यांचे कुटुंबीय किंवा त्यांचे नातेवाईक मीडियासमोर कोणतेही वक्तव्य करणार नाहीत. २३ एप्रिल रोजी अमृतसर येथून खासदाराला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमृतपाल सिंग पंजाबमधील खांडूर साहिब येथून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तुरुंगातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि लोकसभा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत अमृतपाल सिंग हे जवळपास २ लाख मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या कुलबीर सिंग झिरा यांचा १ लाख ९७ हजार १२० मतांनी पराभव केला.