खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:38 PM2024-07-03T18:38:21+5:302024-07-03T18:40:08+5:30
Amritpal Singh : लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर अमृतपाल सिंगला पुन्हा दिब्रुगड तुरुंगात नेण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील खांडूर साहिब मतदारसंघातून विजयी झालेला अमृतपाल सिंग ५ जुलै रोजी संसदेत शपथ घेणार आहे. सरबजीत सिंग खालसा यांनी ही माहिती दिली आहे. अमृतपाल सिंगला काही अटींसह ५ जुलैपासून ४ दिवस किंवा त्यापेक्षा कमी दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला आहे, ज्याची माहिती जेल अधीक्षक दिब्रुगड यांना देण्यात आली आहे.
यापूर्वी पंजाब सरकारने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेल्या वारिस पंजाब दि संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगची लेखी विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवली होती, ज्यामध्ये अमृतपाल सिंगने तात्पुरती सुटका किंवा पॅरोलची मागणी केली होती. अमृतसर पोलीस दिब्रुगड तुरुंगात असलेल्या अमृतपाल सिंगला ५ जुलै रोजी दिल्लीत घेऊन जाणार आहेत, जिथे तो खासदार म्हणून शपथ घेणार आहे. लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर अमृतपाल सिंगला पुन्हा दिब्रुगड तुरुंगात नेण्यात येणार आहे. या काळात अमृतपाल सिंगला कोणालाही भेटू दिले जाणार नाही.
अमृतपाल सिंगचे कायदेशीर सल्लागार इमान सिंग खारा यांनी मंगळवारी (२ जुलै) सांगितले होते की, लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजयाची नोंद करणाऱ्या शीख नेत्याची पत्र एनएसएच्या कलम १५ नुसार कारागृह अधीक्षकांमार्फत ९ जून रोजी पंजाब सरकारला पाठवण्यात आली होती. दिब्रुगड तुरुंग अधीक्षकांनी अमृतपाल सिंगचे पत्र उपायुक्तांना पाठवले होते, त्यांनी ते राज्य सरकारच्या मुख्यालयात पाठवले होते. ज्यात लोकसभा अध्यक्षांना अमृतपाल सिंगला शपथ घेण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमृतपाल सिंग पंजाबमधील खांडूर साहिब येथून अपक्ष खासदार म्हणून निवडून आला आहे. त्याने तुरुंगातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत अमृतपाल सिंग जवळपास २ लाख मतांनी विजयी झाला. त्याने काँग्रेसच्या कुलबीर सिंग झिरा यांचा १ लाख ९७ हजार १२० मतांनी पराभव केला.