अमृतपालचे आयएसआयशी संबंध? पंजाब पोलिसांचा दावा; एनआयएची एंट्री शक्य, ४ सहकाऱ्यांना हलविले आसामला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 06:57 AM2023-03-20T06:57:02+5:302023-03-20T06:57:56+5:30
अमृतपालच्या संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दलजित सिंग कलसी, भगवंत सिंग, गुरमित सिंग आणि पंतप्रधान बाजेका या सदस्यांना एका विशेष विमानाने दिब्रुगडला आणण्यात आले.
चंडीगड/दिब्रुगड : कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या ४ सदस्यांना पंजाबमधून अटक केल्यानंतर रविवारी आसाममधील दिब्रुगडमध्ये नेण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. फरारी अमृतपाल सिंगचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची एंट्री हाेऊ शकते.
अमृतपालच्या संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दलजित सिंग कलसी, भगवंत सिंग, गुरमित सिंग आणि पंतप्रधान बाजेका या सदस्यांना एका विशेष विमानाने दिब्रुगडला आणण्यात आले. ते चौघेही सध्या दिब्रुगड मध्यवर्ती तुरुंगात आहेत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
इंटरनेटबंदीत वाढ
पंजाब सरकारने सोमवारी दुपारपर्यंत मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवांचे निलंबनदेखील वाढवले आहे. सरकारच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यासह हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. अमृतसर ग्रामीण एसएसपी सतिंदर सिंह यांनी सांगितले की, अमृतपालच्या जवळच्या मित्राकडून १०० हून अधिक अवैध काडतुसे सापडली आहेत. चौकशीत अमृतपालने ही काडतुसे दिल्याचे त्याने सांगितले. राज्यव्यापी कारवाईत पाेलिसांनी माेठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
आनंदपूर खालसा फोर्स नावाने सैन्य उभारणी?
डीआयजी स्वपन शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा केला. त्याला परदेशातून निधी मिळत असावा, असा पोलिसांना संशय आहे. अशा परिस्थितीत आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) एंट्री होऊ शकते. अमृतपालने आनंदपूर खालसा फोर्स (एकेएफ) नावाने स्वतःचे खासगी सैन्य तयार करण्याची तयारी केली होती. त्याच्या घरातून आणि साथीदारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांवर एकेएफ लिहिलेले आढळले.
अमृतपालसिंग ताब्यात, वडील, वकिलांचा दावा
अमृतपालच्या अमृतसरमधील जल्लूपूर खेरा या मूळ गावीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गावात त्याचे वडील तरसेम सिंह यांनी आरोप केला आहे की आपल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालपासून त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही.
ट्रक चालक ते ‘भिंद्रानवाले २.०’
दुबईच्या रस्त्यांवर ट्रक चालविणारा अमृतपाल सिंग धर्मोपदेशकापासून कट्टर ‘खलिस्तान’ समर्थक म्हणून पुढे आला. पंजाबला स्वतंत्र करण्याची मागणी करणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकावण्यापर्यंतच्या कारनाम्यांमुळे त्याला ‘भिंद्रनवाले २.०’ असे संबोधण्यात येऊ लागले.