अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:54 AM2018-10-21T06:54:19+5:302018-10-21T06:54:33+5:30

साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

Amritsar accident rail and driver's no fault, rail minister clarifies | अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Next

अमृतसर : साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांनीही याचे खापर प्रशासनावरच फोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेमार्ग ही उत्सवाची जागा नाही. रावणदहनासाठी येथे गर्दी करणे ही रेल्वेच्या हद्दीत घुसखोरी आहे. एवढी गर्दी जमेल, याची प्रशासनाने कल्पना दिलेली नव्हती.
अपघाताची माहिती ड्रायव्हरने अमृतसर रेल्वे स्टेशनात जाऊन दिली. रेल्वे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनुसार ड्रायव्हरचे म्हणणे असे की, रेल्वे फाटक बंद होते व गाडीला हिरवा सिग्नल होता. त्यामुळे गाडी थांबवण्याचे पूर्वसंकेत नव्हते. लोक जमले होते त्याआधी वळण असल्याने नियमानुसार भोंगेही वाजविले. पण तेथे प्रचंड धूर असल्याने पुढचे दिसत नव्हते. त्यामुळे गाडी जमावात शिरल्यावरच विपरीत घडल्याचे लक्षात आले.
रुग्णालयांतील जखमींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सांगितले की, रावणदहनाच्या वेळी फटाक्यांचा आवाज प्रचंड होता. त्यामुळे गाडीचा हॉर्न आम्हाला ऐकूच आला नाही.
>रावणही पडला मृत्युमुखी
ही दुर्घटना घडली त्या भागात शेकडो लहान-मोठे उद्योग आहेत. त्यात बिहार
व उत्तर प्रदेशमधील
कामगार काम करतात. रेल्वेमार्गालगतच्या मैदानावर त्यांचीच रामलीला असते. रामलीलेमध्ये रावणाचे पात्र रंगविले तो दलबीर सिंगही अपघातात मृत्यू पावला. रामलीला संपल्यावर तोही रावणदहन पाहण्यासाठी उभा होता. मात्र त्याने सात ते आठ जणांना वाचवले.

Web Title: Amritsar accident rail and driver's no fault, rail minister clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.