अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोदींनी दिला खास 'टास्क'! म्हणाले- आता वेळ वाया न घालवता गाठायचेय लक्ष्य
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 22, 2020 03:32 PM2020-12-22T15:32:31+5:302020-12-22T15:34:13+5:30
AMU 100 Years : मोदी म्हणाले, 1920मध्ये तेव्हाच्या तरुणांनी एक लक्ष्य समोर ठेवले होते, तेव्हा 1947ला देश स्वतंत्र्य झाला. मात्र, 2020 पासून 2047 पर्यंतचा काळ आता अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे.
लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतिहासापासून ते आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे कोतुक केले. तसेच येथील हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना एक खास टास्कदेखील दिला.
मोदी म्हणाले, AMUला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. अशात शंभर हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी काही संशोधन करावे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना, अशा स्वतंत्र्यता सेनानींवर संशोधन करा, ज्यांच्याविषयी समाजात फारशी माहिती नाही. यात 75 आदिवासी स्वतंत्रता सेनानी, तर 25 महिला स्वतंत्रता सेनानींची माहिती एकत्रित करावी. तसेच पुरातन पांडुलिपीदेखील डिजिटल माध्यमाने जगासमोर आणावी, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
2047 पर्यंतचा काळ अत्यंत महत्वाचा -
मोदी म्हणाले, 1920मध्ये तेव्हाच्या तरुणांनी एक लक्ष्य समोर ठेवले होते, तेव्हा 1947ला देश स्वतंत्र्य झाला. मात्र, 2020 पासून 2047 पर्यंतचा काळ आता अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे.
आता वेळ वाया न घालता लक्ष्य गाठायचे आहे -
आपण जेव्हा एक लक्ष्य साध्य करण्यासाठी पुढे पाऊल टाकू, तेव्हा काही लोक असेही असतात, की ज्यांना याचा त्रास होतो. असे लोक सर्वच समाजात असतात. मात्र, त्यांना बाजूला सारून आपल्याला देशासाठी कार्य करायला हवे. गेल्या शतकात मतभेदाच्या नावाखाली मोठा वेळ वाया गेला आहे. मात्र, आता वेळ वाया न घालता आपल्याला आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठायचे आहे, असे मोदी म्हणाले.
कोरोना काळात AMUने केली मदत -
पंतप्रधान मोदी म्हणाले, AMUच्या भिंतींमध्ये देशाचा इतिहास आहे. येथून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी जग भरात देशाची मान उंचावत आहेत. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसोबत अनेक वेळा देशाबाहेर भेटण्याचा प्रसंगही आला आहे, जे नेहमीच आनंदी आणि शेर-ओ-शायरीच्या अंदाजात दिसतात. AMUने कोरोनाकाळात समाजाची मोठी मदत केली आहे. मोफत चाचण्या करवल्या आहेत. प्लाझ्मा बँक तयार करण्यात आली. एवढेच नाही, तर पीएम केअर्स फंडात मोठे योगदानही केले आहे.