हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 09:34 AM2019-03-20T09:34:25+5:302019-03-20T09:53:03+5:30
मनोहर पर्रिकरांनी पणजीत रविवारी अखेरचा श्वास घेतला
Next
नवी दिल्ली: गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अमूलनं श्रद्धांजली वाहिली आहे. पर्रिकर यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो वापरुन अमूलनं त्यांना आदरांजली वाहिली. 'हर गाव का मनोहर' असं शीर्षक या फोटोला देण्यात आलं आहे. 'आदरणीय राजकारणी आणि नेत्याला सलाम', अशा शब्दांमध्ये अमूलनं पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पित केली.
#Amul Topical: Tribute to revered politician and leader... pic.twitter.com/Zh7Eaou6lS
— Amul.coop (@Amul_Coop) March 19, 2019
रविवारी (17 मार्च) पर्रिकर यांनी पणजीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रस्त होते. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तीनवेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या पर्रिकर यांच्या निधनाबद्दल सर्वांनीच शोक व्यक्त केला. अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या पर्रिकरांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
पर्रिकर यांच्या निधनानंतर मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'मनोहर पर्रीकर अतुलनीय नेते होते. ते एक सच्चे देशभक्त आणि उत्तम प्रशासक होते. ते कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी केलेली देशाची सेवा येणाऱ्या अनेक पिढ्या विसरणार नाहीत. त्यांच्या निधनानं अतिशय दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाच्या आणि समर्थकांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती,' अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्विटरवर पर्रिकरांना आदरांजली वाहिली होती.