हृदयद्रावक! मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:05 PM2023-10-25T17:05:44+5:302023-10-25T17:06:04+5:30
११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले.
गरबा खेळून बक्षिस जिंकणाऱ्या मुलीच्या डोक्यावर काही क्षणातच दु:खाचा डोंगर कोसळला. ११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले. खरं तर आयोजकांनी तिच्या वडिलांना मारहाण करून त्यांची हत्या केली. गुजरातच्या पोरबंदर येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. बक्षिस विजेत्या मुलीच्या आईने आयोजकांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने स्पर्धेत विजय मिळवून देखील तिला बक्षिस मिळाले नाही. यानंतर वाद चिघळला अन् आयोजकांनी मुलीच्या वडिलांना संपवले.
पोलिस उपअधीक्षक रूतू राबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सरमन ओडेदरा यांच्यावर पोरबंदर येथील कृष्णा सोसायटीजवळ मंगळवारी रात्री सात जणांनी जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात सरमन ओडेदरा यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येत सहभागी असलेल्या सातही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. राजा कुचडिया, राजू केशवाला, रामदे बोखिरिया, प्रतिक गोरानिया आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे.
गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा'
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी कृष्णा पार्कमध्ये गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिथे जवळच ओडेदरा कुटुंबीय राहतात. ओडेदरा यांच्या पत्नीने सांगितले की, त्यांची मुलगी गरबा खेळून घरी आली पण तिने स्पर्धा जिंकूनही बक्षिस न मिळाल्याचे सांगितले. लेकीच्या सांगण्यावरून सरमन ओडेदरांची पत्नी मालीबेन हिने आयोजकांकडे धाव घेतली अन् वाद चिघळला. त्यांनी घरी जाण्यास सांगितले याशिवाय तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी शिवीगाळ केल्यानंतर मालीबेन या मुलीला घेऊन घरी परतल्या.
सात नराधम ताब्यात
मालीबेन घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि चार मुख्य आरोपींनी ओडेदरा यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मालीबेन यांना देखील मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी हद्दच केली अन् मुलीच्या वडिलांना गरबा सुरू असलेल्या ठिकाणी नेले आणि पोलीस येईपर्यंत बेदम मारहाण केली, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सरमन ओडेदरा यांना इस्पितळात नेले. पण दुर्दैवाने ओडेदरा यांचा आधीच मृत्यू झाला होता.