कुटुंबानं मानली हार तरी महिलेनं जगण्याची जिद्द सोडली नाही; ६ दिवसांत ५ वेळा हार्टअटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:29 AM2023-03-15T09:29:49+5:302023-03-15T09:30:32+5:30
हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि लठ्ठपणा.
नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ३० ते ५० वयोगटातील लोक हार्ट अटॅकचे अधिक बळी ठरत आहेत. मात्र, यामागचे कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. याचवेळी एक असं प्रकरण समोर आलंय जिथे एका ८१ वर्षीय महिलेला ६ दिवसात ५ वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जीव वाचला.
दिल्ली मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेला श्वसनाचा गंभीर त्रास होत असल्याने हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. महिलेचं हृदय केवळ २५ टक्के काम करत होते. रुग्णालयात ६ दिवसांच्या उपचारावेळी महिलेला ५ वेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात इलेक्ट्रिकचा झटका देऊन महिलेचे हृदय पुन्हा सुरू करण्यात आले. महिलेचा जीव वाचला हे चमत्कारापेक्षा कमी नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पहिल्यांदा महिला रुग्णावर अँजिओग्राफी करण्यात आली आणि तात्पुरता पेसमेकर टाकण्यात आला. यादरम्यान महिलेला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी स्वयंचलित इम्प्लांट करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर (AICD) चा अवलंब केला. हे एक लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा वापर हृदयाच्या असामान्य ठोक्यांची देखरेख आणि हार्ट बीट ठीक करण्यासाठी केला जातो. या उपकरणांचा उपयोग गंभीर हृदयरोग्यांच्या उपचारासाठी केला जातो. ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. उपचार यशस्वी झाले असून महिलेचे प्राण वाचले आहेत असं डॉक्टर बलबीर सिंह यांनी म्हटलं.
कुटुंबाने मानली होती हार
वृद्ध महिलेवर कोणतेही औषध परिणाम करत नव्हते, अशा परिस्थितीत वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी अपेक्षा सोडली होती. मात्र, या प्रकरणी एक चमत्कार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ८१ वर्षीय महिलेला पुन्हा जीवनदान मिळाले. आता या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती ठीक आहे.
हृदयविकाराचा झटका का येतो?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि लठ्ठपणा. कोणतेही शारीरिक काम केले नाही, शरीराची हालचाल केली नाही तरी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. वाढत्या वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीत बदल करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्याने बरेच लोक बरे होतात, परंतु जे गंभीर हृदयाचे रुग्ण आहेत, त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची गरज आहे.